मुंबई नगरी टीम
मुंबई : काल पुलवामातील केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या ताफ्यावर झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांनी तीव्र शब्दांमध्ये निषेध केला आहे. पाकिस्तानला सोडणार नाही, अशा तोंडी वाफा दवडण्यापेक्षा एकदाच त्यांचा सोक्षमोक्ष लावा असे उध्दव ठाकरे यांनी म्हटले आहे.हा हल्ला केवळ दहशतवादी हल्ला नाही तर हा गुप्तचर यंत्रणेच्या चिंधड्या उडवणारा हल्ला असून, या हल्ल्याची माहिती असूनही त्याकडे दुर्लक्ष केले गेले असेल, तर संबंधितांवर कठोर कारवाई करा अशी मागणी उध्दव ठाकरे यांनी आज पत्रकार परिषदेत केली.
काश्मीरमधील पुलवामातील अवंतीपुराध्ये काल केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या ताफ्यावर दहशतवादी हल्ला झाला. यामध्ये ४० जवान शहीद झाले. आज या हल्ल्याचा निषेध करीत पंतप्रधान नरेंद्र मोदींना पाकिस्तानला स्पष्ट शब्दांमध्ये इशारा दिला आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी आज घेतलेल्या पत्रकार परिषदेत या हल्ल्याचा निषेध करीत पाकिस्तानला धडा शिकवण्याची मागणी केली आहे. आता कोणाला सोडणार नाही , या तोंडी वाफा दवडण्यापेक्षा एकदाच याचा सोक्षमोक्ष लावला पाहिजे अशी मागणी त्यांनी केली. दोन वर्षापूर्वी भारतीने केलेल्या सर्जिकल स्ट्राइकचा संदर्भ देत उध्दव ठाकरे यांनी या पेक्षाही कठोर कारवाई केली पाहिजे अशी मागणी केली. हा सर्जिकल स्ट्राईक पाकव्याप्त काश्मीरमध्ये करण्यात आला होता. तो भारताचाच भाग आहे. मात्र आता त्यापेक्षा पुढे जावून कारवाई करायला हवी असे उध्दव ठाकरे म्हणाले.नुसते दंड थोपटून काही होत नाही तर याचा सोक्षमोक्ष लावा.निवडणुका प्रचार जाऊ द्या बाजूला. आधी पाकिस्तानला जशास तसे उत्तर द्या अशी मागणी त्यांनी केली.
काल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी भेट झाली. या भेटीत शेतक-यांचे प्रश्न आणि ब-यांच बाबतीत चर्चा झाली मात्र या सगळ्या गोष्टी गौण आहेत, मात्र सध्या हा विषय अतिशय गंभीर आहे. आता पाकिस्तानला जशास तास उत्तर देणे हे सगळ्यात महत्त्वाचे आहे.युती ,निवडणुका हे चालूच राहील, पण पाकिस्तानला आता सोडू नका असेही ठाकरे म्हणाले.