दुस-या टप्प्यातील १ हजार ४५४ कोटींचा दुष्काळी निधी वितरीत

मुंबई नगरी टीम

मुंबई : गेल्या वर्षी खरीप हंगामात अपुऱ्या पर्जन्यमानामुळे दुष्काळी जाहीर केलेल्या १५१ तालुक्यातील शेतकऱ्यांना पीक नुकसानपोटीचा सुमारे १४५४ कोटी रुपयांचा दुसरा हप्ता राज्य शासनाने वितरित केला असल्याची माहिती मदत व पुनर्वसन विभागाचे सचिव किशोरराजे निंबाळकर यांनी दिली.

केंद्राच्या दुष्काळ संहितेप्रमाणे राज्यातील १५१ तालुक्यात राज्य शासनाने दुष्काळ जाहीर केला आहे. या तालुक्यातील शेतकऱ्यांना पीक नुकसानीची मदत देण्यासाठी २ हजार ९०९ कोटी ५१ लाख ९ हजार रुपयांची मदत वितरित करण्यास मान्यता दिली होती. त्यापैकी मदतीचा पहिला हप्ता यापूर्वीच देण्यात आला होता. आता उर्वरित १ हजार ४५४ कोटी ७५ लाख ५४ हजार ६८० एवढी रक्कम विभागीय आयुक्तांकडे वर्ग करण्यात आला आहे. ही रक्कम तातडीने पात्र बाधित शेतकऱ्यांच्या खात्यावर वितरित करण्याच्या सूचना देण्यात आल्या असल्याचे  निंबाळकर यांनी सांगितले. शेतकऱ्यांना तातडीने मदत पोहचावी, यासाठी मदत निधीचा दुसरा हप्ता तत्काळ वितरित करण्यात आला असल्याचेही त्यांनी सांगितले.

दुसऱ्या हप्त्यात कोकण विभागाला सुमारे ७.०६ कोटी, नाशिक विभागाला ४४६.४८ कोटी, पुणे विभागाला २०६.५९ कोटी, औरंगाबाद विभागास ५२५.२९ कोटी, अमरावती विभागास २३७.१८ कोटी आणि नागपूर विभागास ३२.१३ कोटी रुपये वितरित करण्यात आले असून ३१मार्चपूर्वी सर्व पात्र शेतकऱ्यांच्या बँक खात्यात पैसे जमा करण्याच्या सूचना संबंधित विभागीय आयुक्त व जिल्हाधिकारी यांना देण्यात आल्या आहेत.यापूर्वीकोकण, नाशिक, औरंगाबाद, अमरावती, नागपूर व पुणे विभागास पहिल्या हप्त्याची १ हजार ४५४ कोटी ७५ लाख ५४ हजार ६८० एवढी  रक्कम २९ जानेवारी २०१९ रोजीच्या शासन निर्णयाद्वारे वितरित करण्यात आली आहे. दुष्काळी परिस्थितीत शेतकऱ्यांना पीक नुकसानीची मदत लवकरात लवकर मिळावी यासाठी राज्य शासनाने ही मदत जाहीर केली असल्याचे सचिव  निंबाळकर यांनी सांगितले

Previous articleयापुढे शिवसेनेशी राज्य पातळीवरील नेतेच चर्चा करणार
Next articleरक्षा खडसे यांचे भवितव्य अधांतरी