राहुल गांधींच्या शिवाजी पार्कवरील सभेला परवानगी नाकारली
मुंबई नगरी टीम
मुंबई : काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांच्या शिवाजी पार्कवरील सभेला परवानगी नाकारण्यात आली आहे.काँग्रेसचा पक्षाने सभेसाठी केलेला अर्ज फेटाळण्यात आला आहे. त्यामुळे राहुल गांधी यांची सभा एमएमआरडीएच्या मैदानात होणार आहे.
शिवसेना,भाजप,मनसे आणि वंचित आघाडीला सभेसाठी परवानगी मिळते.पण काँग्रेसला परवानगी नाकारली जाते,असा आरोप काँग्रेसने केला आहे.लोकशाही व्यवस्थेत सर्वांना समान न्याय मिळाला पाहिजे,असे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण म्हणाले.
येत्या १ मार्चला राहुल गांधी यांची मुंबई येथे सभा होत आहे. या सभेसाठी काँग्रेसने शिवाजी पार्क मैदान मिळावे,म्हणून अर्ज केला होता. परंतु निवडणुका तोंडावर आल्या असल्याने राजकीय वातावरण गरम झाले आहे. त्यामुळे राहुल गांधी यांच्या सभेला शिवाजी पार्क मैदान मिळू देण्यात आलेले नाही,अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. यापूर्वी मनसेलाही शिवाजी पार्क येथे सभा घेण्यासाठी परवानगी नाकारली होती.त्या प्रकरणात मोठा राजकीय विवाद निर्माण झाला होता. मनसे या निर्णयाविरोधात सर्वोच्च न्यायालयात गेली होती. पण सर्वोच्च न्यायालयाने त्यांना परवानगी नाकारली होती.मात्र राहुल गांधी यांच्या सभेला कोणत्या कारणांमुळे परवानगी नाकारण्यात आली,हे स्पष्ट झाले नाही. मात्र काँग्रेसने या मुद्द्यावर फारसे राजकारण न करता सभेचे स्थळ बदलले आहे.युतीनंतर प्रथमच राहुल गांधी यांची मुंबईत सभा होत असल्याने ते काय बोलणार,याची प्रचंड उत्सुकता राज्यात आहे. काँग्रेसने सभेची जोरदार तयारी केली आहे