उपसभापतीपदी नीलम गोऱ्हे की अनिल परब
मुंबई नगरी टीम
मुंबई: गेल्या अधिवेशनात शिवसेनेला उपाध्यक्षपद दिल्यानंतर शिवसेना भाजप युतीच्या पार्श्वभूमीवर आता शिवसेनेला विधान परिषदेचे उपसभापतीपद दिले जाणार आहे. त्यामुळे रिक्त असेलेल्या उपसभापतीपदी शिवसेनेकडून डॉ. नीलम गोऱ्हे की अनिल परब यांना संधी दिली जाणार याकडे लक्ष लागले आहे.
उद्यापासुन सुरू होणा-या अर्थसंकल्पीय अधिवेशनाला सुरूवात होणार आहे. या अधिवेशनात विधानपरिषदेचे उपसभापतीपद शिवसेनेला दिले जाईल. या पदासाठी निवडणूक कार्यक्रम जाहीर करण्याचा प्रस्ताव सत्ताधारी भाजप-शिवसेनेने सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांना दिला आहे. काँग्रेसचे माणिकराव ठाकरे यांची मुदत संपल्यानंतर त्यांनी उपसभापतीपदाचा राजीनामा दिला होता. तेव्हा पासुन हे पद रिक्त आहे. विधान परिषदेत बहुमत असल्याचा दावा सत्ताधा-यांनी केला असून डॉ. नीलम गोऱ्हे यांना शिवसेनेकडून उमेदवारी दिली जाण्याची शक्यता आहे. शिवसेनेचे गट नेते अनिल परब यांचाही या पदासाठी विचार केला जावू शकता मात्र उपसभापतीपदाची माळ डॉ. नीलम गोऱ्हे यांच्या गळ्यात पडण्याची शक्यता आहे.