अर्थसंकल्पीय अधिवेशन की लोकसभेची लगबग

अर्थसंकल्पीय अधिवेशन की लोकसभेची लगबग

मुंबई नगरी टीम

मुंबई : राज्य विधिमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन उद्या सोमवारपासून  सुरू होणार असून,केवळ सात दिवस चालणा-या या अधिवेशनावर आगामी  लोकसभा निवडणुकीची छाया असेल.लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यातील बेरोजगारी, दुष्काळ, शेतक-यांचे प्रश्न हाच मुद्दा प्रामुख्याने विरोधी पक्ष उपस्थित करण्याची शक्यता आहे.

उद्यापासुन सुरू होणा-या  अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर आज दुपारी विरोधी पक्ष नेते राधाकृष्ण विखे पाटील यांच्या निवासस्थानी विरोधी पक्ष गट नेत्यांची बैठक होणार असून,या बैठकीत सत्ताधा-यांना घेरण्याची रणनिती आखली जाईल. त्यानंतर दुपारी ३ वाजता संयुक्त पत्रकार परिषद होणार आहे. सत्ताधा-यांना शेतक-यांचे, तरूण बेरोजगारांचे प्रश्न हाताळण्यात आलेले अपयश याचे कारण देत विरोधी पक्ष मुख्यमंत्र्यांनी अधिवेशनाच्या पुर्वसंध्येला आयोजित केलेल्या चहापान कार्यक्रमावर बहिष्कार टाकण्याची शक्यता आहे.

शिवसेना आणि भाजपाची झालेली युती आणि आगामी  लोकसभा निवडणूकीच्या तोंडावर उद्यापासुन सुरू होणारे अर्थसंकल्पीय अधिवेशनावर केवळ लोकसभा निवडणुकीची छाया असेल.या अर्थसंकल्पीय अधिवेशनात येत्या २७ फेब्रुवारीला लेखानुदान सादर केले जाईल. त्यावर २८ फेब्रुवारीला चर्चा करण्यात येईल. पूर्ण अर्थसंकल्प पावसाळी अधिवेशनात मांडण्यात येईल.राज्यपाल सी. विद्यासागर राव यांच्या अभिभाषणाने अर्थसंकल्पीय अधिवेशनाला सुरुवात होईल. केवळ सात दिवस चालणा-या या अधिवेशनात १ मार्च रोजी राज्यातील दुष्काळी परिस्थितीवर  चर्चा होईल आणि २ तारखेला म्हणजे अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी या चर्चेचे उत्तर दिले जाईल.

 

Previous articleउपसभापतीपदी नीलम गोऱ्हे की अनिल परब ?
Next articleज्यांना अफजलखान म्हटले त्यांनाच मिठी मारली