ज्यांना अफजलखान म्हटले त्यांनाच मिठी मारली 

ज्यांना अफजलखान म्हटले त्यांनाच मिठी मारली 

मुंबई नगरी टीम

मुंबई : राज्य विधिमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन आज सोमवारपासून  सुरू होत असून,केवळ सात दिवस चालणा-या या अधिवेशनावर आगामी  लोकसभा निवडणुकीची छाया असेल. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आयोजित केलेल्या चहापानावर  विरोधी पक्षांनी बहिष्कार टाकला तर भाजपा शिवसेना युती भगव्या नाही तर फसव्या विचारांची असून, ज्यांना अफजलखान म्हटले त्यांनाच शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मिठी मारली अशी घणाघाती टीका विधानसभेचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी केली पत्रकार परिषदेत केली.

उद्यापासुन सुरू होणा-या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर  विरोधी पक्ष नेते राधाकृष्ण विखे पाटील यांच्या निवासस्थानी विरोधी पक्ष गट नेत्यांची बैठक पार पडली त्यानंतर आयोजित करण्यात आलेल्या संयुक्त पत्रकार परिषदेत मुख्यमंत्र्यांनी अधिवेशनाच्या पुर्वसंध्येला आयोजित केलेल्या चहापान कार्यक्रमावर बहिष्कार टाकल्याची घोषणा विरोधी पक्ष नेत्यांनी केली. भाजपा आणि शिवसेनेची युती भगव्या नाही तर फसव्या विचारांची असून, ज्यांना अफजलखान म्हटले त्यांनाच शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मिठी मारली अशी घणाघाती टीका विधानसभेचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी केली.

अधिवेशनात शेतकऱ्यांच्या सरसकट कर्जमाफीची मागणी करणार असल्याचे विखे पाटील म्हणाले. सरकार या  अधिवेशनाचा वापर आपल्या  जाहीरनाम्यासाठी  करणार अशी टीकाही त्यांनी केली. शेतकरी कर्जमाफी, शासकीय नोकरभरती आदी मुद्द्यांवर सरकारला अधिवेशनात जाब विचारणार असल्याचे विरोधकांनी स्पष्ट केले आहे. युती  सरकार केवळ फसव्या घोषणा करत असून आतापर्यंत किती जागांवर भरती केली असा प्रश्न विखे-पाटील यांनी करून ७२ हजार नोकरभरतीबाबत मुख्यमंत्र्यांनी सभागृहात केलेल्या घोषणेला एक वर्ष झाले पण एकही जागा भरलेली नाही.आचारसंहितेच्या तोंडावर पुन्हा नोकरभरतीचे गाजर सरकार दाखवेल असे पाटील म्हणाले.

शिवसेना आणि भाजपाची झालेली युती आणि आगामी  लोकसभा निवडणूकीच्या तोंडावर उद्यापासुन सुरू होणारे अर्थसंकल्पीय अधिवेशनावर केवळ लोकसभा निवडणुकीची छाया असेल.या अर्थसंकल्पीय अधिवेशनात येत्या २७ फेब्रुवारीला लेखानुदान सादर केले जाईल. त्यावर २८ फेब्रुवारीला चर्चा करण्यात येईल. पूर्ण अर्थसंकल्प पावसाळी अधिवेशनात मांडण्यात येईल.राज्यपाल सी. विद्यासागर राव यांच्या अभिभाषणाने अर्थसंकल्पीय अधिवेशनाला सुरुवात होईल. केवळ सात दिवस चालणा-या या अधिवेशनात १ मार्च रोजी राज्यातील दुष्काळी परिस्थितीवर  चर्चा होईल आणि २ तारखेला म्हणजे अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी या चर्चेचे उत्तर दिले जाईल.

Previous articleअर्थसंकल्पीय अधिवेशन की लोकसभेची लगबग
Next articleचहापानाचा कार्यक्रम आयोजित करणे ही सरकारची असंवेदनशीलता