अकरावी प्रवेशासाठी इन-हाउस कोटा आता १० टक्के

अकरावी प्रवेशासाठी इन-हाउस कोटा आता १० टक्के

मुंबई नगरी टीम

मुंबई : पुढील वर्षी अकरावी प्रवेशासाठी १६ टक्के आरक्षण एसईबीसी आणि १० टक्के आरक्षण खुल्या प्रवर्गातील आर्थिकदृष्टया दुर्बल घटकांना मिळणार असल्यामुळे आरक्षणाची टक्केवारी १०३ टक्केपर्यंत जाईल आणि अकरावीच्या खुल्या गटातील विद्यार्थ्यांना जागाच मिळणार नाही असा अनावश्यक समज निर्माण केला जात आहे.  परंतू, ज्या शाळांमध्ये, कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये आतापर्यंत २० टक्के इन-हाऊस कोटा आहे तो इन-हाऊस कोटा यंदापासून १० टक्के राखीव इतका करण्यात आला आहे. त्यामुळे अकरावीच्या प्रवेशासाठी सर्व आरक्षणानंतरही ७ टक्के जागा या खुल्या गटासाठी शिल्लक रहाणार आहेत, असे शिक्षणमंत्री विनेाद तावडे यांनी आज मंत्रालयात पत्रकार परिषदेत स्पष्ट केले.  त्यामुळे दहावीच्या परिक्षेला बसणाऱ्या विद्यार्थ्यांनी कुठल्याही प्रकारचे टेन्शन घेऊ नये, पॅनिक होऊ नये व आपला अभ्यास नीट करुन परिक्षा द्यावी आणि चांगले मार्क मिळणाऱ्या विद्यार्थ्यांना कनिष्ठ महाविद्यालयात नक्कीच प्रवेश मिळेल असे  विनेाद तावडे यांनी स्पष्ट केले.

अकरावीच्या प्रवेशासंदर्भात वस्तुस्थिती स्पष्ट करताना तावडे म्हणाले की, १६ टक्के जागा एसईबीसी साठी तरी १० टक्के जागा खुल्या प्रवर्गातील आर्थिकदृष्टया दुर्बल घटकासाठी राखीव असल्यामुळे आरक्षणाचे प्रमाण हे स्वाभिकरित्या वाढणार आहे.  मुंबईत १८८७ विविध शाखांची कनिष्ठ महाविद्यालये आहेत त्यापैकी ६३९ कनिष्ठ महाविद्यालयात इन-हाऊस प्रवेश कोटा आहे. यापैकी ३०६ महाविद्यालये ही अल्पसंख्याक आहेत. तर ३३३ वरिष्ठ माध्यमिक शाळा किंवा कनिष्ठ महाविद्यालये ही बिगर अल्पसंख्याक आहेत. तिथे इन-हाऊस कोटा लागू होतो. या ३३३ बिगर अल्पसंख्याक कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये आपण जर गेल्या वर्षीचे अकरावीच्या प्रवेश प्रक्रियेचे आरक्षणाचे नियम पाहिले तर १०३ टक्के आरक्षण नक्कीच होईल. परंतू, या कनिष्ठ महाविद्यालयांच्या व्यवस्थापनासमवेत आपण महिना भरापूर्वी या मुद्दयांच्या अनुषंगाने संबंधितांशी चर्चा केली. सध्या या महाविद्यालयांमध्ये प्रवेशाचा इन-हाऊस कोटा २० टक्के आरक्षित आहे. ही आरक्षणाची पध्दत कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये जुन्या काळापासून आहे. तथापि, या कनिष्ठ महाविद्यालयांशी झालेल्या चर्चेअंती हे २० टक्के आरक्षण यंदापासून १० टक्के करण्यात आले. त्यामुळे, स्वाभाविकपणे जरी एसईबीसी, आर्थिक दृष्टया दुर्बल आणि इन-हाऊस १० टक्के आरक्षण लागू झाले तरीही प्रवेश प्रक्रियेसाठी खुल्या प्रवर्गासाठी ७ टक्के जागा या रिक्त रहातात, असे  तावडे यांनी स्पष्ट केले.

 खुल्या प्रवर्गातील अनेक विद्यार्थी एसईबीसी (१६ टक्के) आणि खुल्या प्रवर्गातील आर्थिक दृष्टया दुर्बल (१० टक्के) या राखीव गटांमध्ये ११वी मध्ये प्रवेशित होत असूनही ७ टक्के जागा खुल्या प्रवर्गासाठी शिल्लक रहातात. हे सर्व आरक्षण मिळून ३३ टक्क्यांपर्यंत जाते त्यामुळे एका अर्थाने खुल्या प्रवर्गासाठी या ३३ टक्के आरक्षणातून अकरावीसाठी विद्यार्थ्यांना प्रवेश मिळू शकतो. असे स्पष्ट करताना  तावडे म्हणाले की, गेल्या वर्षी झालेल्या अकरावीच्या प्रवेश प्रक्रियेत इन-हाऊस कोटयामध्ये ६३९ महाविद्यालयांमध्ये एकूण ४०१५६ विद्यार्थ्र्यांपैकी १६७९९ विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला आणि इनहाऊस कोटयामधील अन्य जागा या रिक्त राहिल्या होत्या. पुण्यामध्ये ८३६ विविध शाखांची कनिष्ठ महाविद्यालये आहेत. या पैकी २२३ महाविद्यालये ही इनहाऊस कोटयातील आहेत. यापैकी ५२ महाविद्यालये अल्पसंख्याक असून १७१ बिगर अल्पसंख्याक आहेत. पुण्यामधील या २२३ महाविद्याल्यांमध्ये गेल्या वर्षी ११वी च्या प्रवेश प्रक्रियेत इनहाऊस कोटयातील एकूण १४२७४ जागांपैकी ८३६६ विद्यार्थ्यांनींच अकरावीत प्रवेश घेतला व अन्य इन-हाऊस कोटयातील जागा रिक्त राहिल्या, ही वस्तुस्थिती  तावडे यांनी यांप्रसगी निदर्शनास आणून दिली.

तरीही, पुढील वर्षाच्या ११ वी प्रवेश प्रक्रियेमध्ये २० टक्के इन-हाऊस प्रवेश कोटा १० टक्यांपर्यंत केला आहे. तसेच, के.सी. कॉलेज, मिठीबाई कॉलेज, एन.एम.कॉलेज, झेविअर्स कॉलेज आदी महाविद्यालयांकडे विद्यार्थ्यांचा ओढा असतो.  ती महाविद्यालये अल्पसंख्यांक असल्याने तिथे ५० टक्के आरक्षण व मायनेारिटी सोबत बाकी कुठलचे आरक्षण नाही. त्यामुळे तिथे देखील विद्यार्थ्यांना प्रवेशाची संधी आहे असेही तावडे यांनी स्पष्ट केले.

 

Previous articleभाजपसह १४  राजकीय पक्षांना  निवडणूक आयोगाची नोटीस
Next articleस्मार्टफोनची किंमत ही सॉफ्टवेअर, डाटा कार्ड आदी साहित्यासह