शहिदांच्या कुटुंबियांना शेतीयोग्य जमिनीचे वाटप 

शहिदांच्या कुटुंबियांना शेतीयोग्य जमिनीचे वाटप 

मुंबई नगरी टीम

मुंबई  : शहीद जवानांच्या कुटुंबियांच्या पाठीशी राज्य शासन खंबीरपणे उभे असून शहीद जवानांच्या कुटुंबियांना आधार देणे हे राज्य शासनाचे कर्तव्यच असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.

सह्याद्री अतिथीगृह येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत शहीद जवानांच्या वीरपत्नी, वीरमाता यांना शेतीयोग्य जमिनीचे आज वाटप करण्यात आले.

मुख्यमंत्री यावेळी म्हणाले, कर्तव्यावर असताना जे जवान शहीद होतात त्यांच्या कुटुंबियांचे होणारे नुकसान कधीही भरुन येणारे नसते. परंतु काही दिवसांपूर्वी राज्य शासनाने महाराष्ट्रातील शहीद जवानांच्या कुटुंबियांना रोख स्वरुपातील मदतीबरोबरच त्यांच्या जिल्ह्यात शेती करता येईल अशी जमीन देण्याचा निर्णय घेतला. शहीद झालेल्या जवानांच्या कुटुंबियांचे पुनर्वसन करणे, त्यांना आधार देणे याला प्राधान्य देत आज शहीद जवानांच्या माता किंवा पत्नी यांना शेतीसाठी जमीन देण्यात आली. आज रायगड जिल्ह्यातील ७ शहिदांच्या कुटुंबियांना जमिनीचे प्रमाणपत्र देण्यात आले असून सर्व जिल्ह्यात हा उपक्रम राबविण्यात येणार आहे.

आज झालेल्या वाटपात रायगड येथील सात शहीद जवानांच्या पत्नी/माता यांना जमिनींची कागदपत्रे प्रदान करण्यात आली. त्यात शहीद रघुनाथ सावंत,शहीद विठोबा सावंत, शहीद नथुराम कासारे, शहीद प्रकाश सावंत, शहीद कुशाबा जाधव, शहीद निलेश तुणतुणे, शहीद धोंडू यादव यांच्या वीर माता,पत्नी यांचा समावेश होता.या शहीद जवानांनी भारत पाकिस्तान यांच्यामधील १९७१ चे युध्द, ऑपरेशन रक्षक काश्मिर १९९३, दुसरे महायुध्द १९४४, ऑपरेशन रक्षक जम्मू काश्मीर १९९८ आणि भारत पाकिस्तान यांच्यातील १९६५ मधील युध्दात आपले बलिदान दिले आहे.

Previous articleभाजप खासदार किरीट सोमय्यांकडून सर्वाधिक निधी खर्च
Next articleमुंबई महानगरपालिका हद्दीतील ५०० चौरस फुटांपर्यंतच्या घरांना  मालमत्ता कर माफ