डाॅ. प्रितम मुंडे यांच्या प्रचार सभेसाठी अंबाजोगाईत लोटला जनसागर

डाॅ. प्रितम मुंडे यांच्या प्रचार सभेसाठी अंबाजोगाईत लोटला जनसागर

मुंबई ‌नगरी टीम

अंबाजोगाई : लोकनेते गोपीनाथरावजी मुंडे यांनी महाराष्ट्राच्या राजकारणाला नवी दिशा दिली. त्यांनी प्रयत्नपूर्वक भारतीय जनता पक्ष तळागाळातील लोकांपर्यंत पोहोचविला. त्यांच्याशिवाय भाजप पूर्ण होऊ शकत नाही. त्यांचा वारसा खंबीरपणे चालविण्याचे काम पंकजाताई आणि प्रीतम मुंडे या भगिनी करत आहेत. गोपीनाथराव मुंडे यांचे नाव लावण्याचा अधिकारी या भगिनींना तर आहेच, परंतु ज्यांनी त्यांच्यासोबत बेईमानी केली नाही त्या प्रत्येकाला गोपीनाथराव मुंडे यांचे नाव लावण्याचा अधिकार आहे, तसाच मला देखील आहे अश्या शब्दात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रीतमताई यांनी वडिलांचे नाव लावण्याबाबत आक्षेप घेणारांना फटकारले. अंबाजोगाई येथे आयोजित विजयी संकल्प मेळाव्यात ते बोलत होते. प्रीतमताईंना मत म्हणजे नरेंद्र मोदींना मत, त्यामुळे सशक्त सरकारसाठी प्रीतमताई मुंडे यांना पुन्हा एकदा विक्रमी मतांनी निवडून द्या असे आवाहन मुख्यमंत्र्यांनी केले.

बीड लोकसभा मतदारसंघातील भाजपा-शिवसेना युतीच्या उमेदवार डॉ. प्रितम मुंडे यांच्या प्रचारार्थ अंबाजोगाईतील वंजारी वसतीगृहाच्या मैदाानावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सभेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी मुख्यमंत्री बोलत होते. यावेळी व्यासपिठावर केंद्रीय मंत्री रामदास आठवले, बीड जिल्ह्याच्या पालकमंत्री पंकजा मुंडे, डॉ. प्रितम मुंडे, आ. जयदत्ता क्षीरसागर, आ. सुरेश धस, आ. संगिता ठोंबरे, आ. आर. टी. देशमुख, आ. लक्ष्मण पवार, आ. भीमराव धोंडे, रमेशराव आडसकर, बाळासाहेब दोडतले, सचिन मुळूक, प्रा. मनोहर धोंडे, पप्पू कागदे, आदिनाथ नवले, रमेश पोकळे यांची उपस्थिती होती.

यावेळी बोलताना मुख्यमंत्री म्हणाले कि, मागील साडेचार वर्षाच्या काळात पंकजाताई आणि प्रीतमताईंनी हक्काने हजारो कोटींचा निधी बीड जिल्ह्यात खेचून आणला. बीड जिल्ह्यात विविध माध्यमातून पंधरा वर्षात केवळ ४०० कोटी रुपये आघाडी सरकारने दिले होते. तर आमच्या चार वर्षाच्या काळात ३७०० कोटी रुपये देण्यात आले. त्यातून जिल्ह्यात अनेक विकासकामे झाली असून काही पूर्णत्वाच्या मार्गावर आहेत. आज जर गोपीनाथराव मुंडे असते तर ‘जे काम मी करू शकलो नाही, ते माझ्या लेकीने करून दाखविले’ असे ते नक्कीच म्हणाले असते. आज मुद्दे नसल्यामुळे विरोधात निवडणूक जातीवर आणत आहेत. परंतु, जातीमुळे कोणी नेता होत नसतो, त्या जातीसाठी कोण काय करतो यावर नेता ठरत असतो. ५० वर्षापासून प्रलंबित असणारा मराठा आरक्षणाचा प्रश्न आम्ही मार्गी लावला. मराठा आरक्षणाला मुंडे साहेबांनी जाहीर समर्थन दिले होते. त्यांच्या पश्चात पंकजाताईंनीही पूर्ण पाठींबा दिला. १५ वर्षे तुमची सत्ता होती, तेंव्हा का प्रश्न सोडविला नाही, त्यावेळेस तुम्हाला जात आठवली नाही का असा सवाल मुख्यमंत्र्यांनी केला. मराठवाड्याला दुष्काळमुक्त करण्यासाठी २५ हजार कोटींच्या ‘वाॅटरग्रीड’द्वारे आम्ही सर्व धरणे जोडणार आहोत. याचा फायदा बीड जिल्ह्यालाही मोठ्या प्रमाणात होणार असून हा दुष्काळी जिल्हा सुजलाम सुफलाम होण्यास मदत होईल अशी ग्वाही मुख्यमंत्र्यांनी दिली. शरद पवारांना हवेचा अंदाज आल्यानेच त्यांनी निवडणुकीच्या रिंगणातून माघार घेतली असा टोलाही त्यांनी लगावला. पणजोबा, आजोबा, आजी, वडील यांच्यानंतत आता राहुल गांधी पुन्हा ‘गरिबी हटाव’चा नारा देत आहेत. आजवर तुमच्याकडून गरिबी हटली नाही, यापुढे कशी हटणार अशी खरमरीत टीका मुख्यमंत्र्यांनी केली. पुढे बोलतांना मुख्यमंत्री म्हणाले की, मोदींच्या नेतृत्वाखाली देश स्वाभिमानाने उभा आहे. आजपर्यंत ताठ कणा असणारा पंतप्रधान नव्हता. जशास तसे ठोस उत्तर देऊन पाकिस्तानला नमविण्याची कामगिरी त्यांनी केली. मोदींच्या नेतृत्वाखाली सुरक्षित आहे. देशाच्या मुळावर जर कोणी उठत असेल तर त्यांना मते मागण्याचा अधिकारी नाही. असा विरोधकांचा खरपूस समाचार त्यांनी घेतला. मोदींच्या नेतृत्वाखाली सामान्य माणसाला विकासाच्या प्रवाहात आणण्यासाठी जनधन योजना, उज्ज्वला गॅस, शौचालय, आयुष्यमान योजना, घरकुल योजना, अशा असंख्य योजना या केंद्र सरकारने राबविल्या व सर्वसामान्य माणसांच्या जीवनात क्रांती निर्माण केली.

केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी त्यांच्या खास शैलीत गोपीनाथराव मुंडे यांच्यासोबतच्या मैत्रीच्या आठवणी सांगितल्या. गोपीनाथराव मुंडे यांच्या अनेक आठवणी,
साठवून ठेवल्या आहेत माझ्या मनी, ते होते सर्वांचे धनी, आठवणी येतात क्षणोक्षणी असे म्हणत त्यांनी मुंडे साहेबांन श्रद्धांजली वाहिली. संविधान बदलाची भीती घालून विरोधी पक्ष दलित समाजाचे मत खेचण्याचा प्रयत्न करत आहे. परंतु, अशा भूलथापांना बळी न पडता दलित समाजाने एकदिलाने डॉ. प्रीतमताईंच्या पाठीशी राहून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे हात बळकट करावेत असे आवाहन त्यांनी केली. इकडे सर्व चांगले असताना धनंजय मुंडे विनाकारण तिकडे गेले, आता त्यांना कायमस्वरूपी विरोधी पक्ष नेता म्हणूनच राहावे लागेल असा चिमटाही त्यांनी काढला.

यावेळी बोलतांना  पंकजा मुंडे म्हणाल्या की, माझी जादूची कांडी म्हणजे विश्वास आहे. त्यामुळेच लोक आपलेसे होत आहेत. या जादूच्या कांडीने जिल्ह्यातील राष्ट्रवादी रिकामी केली. त्यामुळे अभिनय व भाषणे यांचे क्लासेस आमच्या भावांनी घ्यावेत एवढंच काम त्यांना आता शिल्लक आहे. धोकेबाजांसाठी जर आॅलिम्पीक स्पर्धा निघाली तर यामध्ये ते निश्चित पहिले येतील. ज्यांना काटा लावताना शेतकरी दिसत नाही अशांना आता शेतकऱ्यांचा पुळका आला आहे अशी नाव न घेता सोनवणे यांच्यावर त्यांनी टिका केली. बीड जिल्ह्यात केलेल्या विविध विकास कामांचा पाढा त्यांनी उपस्थितांसमोर वाचून दाखविला. याच वंजारी वसतिगृहात मुंडे साहेब शिकले. त्याचा प्रांगणात सभा घेऊन त्यांची प्रेरणा आम्ही घेत आहोत असेही त्या म्हणाल्या.

जयदत्त क्षीरसागर यांची सभेतील उपस्थिती विशेष आकर्षण ठरली. ते म्हणाले की, काँग्रेस-राष्ट्रवादीवाले आता सरकारला शिव्या देतात आणि निवडणुकीनंतर इव्हीएम मशीनला शिव्या देतात. एवढंच काम त्यांच्या हाती आहे. यावेळी क्षीरसागर यांनी उजनीचे पाणी मांजरा धरणात सोडण्याची मागणी मुख्यमंत्र्यांकडे केली. भाजपाने केलेला विकास पाहूनच आपण त्यांच्या पाठिशी उभे राहिलो. बीड जिल्ह्यातून मोठी ताकद प्रितम यांच्या पाठिशी उभी करू असे आश्वासन त्यांनी यावेळी दिले.

आ. विनायक मेटे यांच्या दुहेरी भूमिकेवरून नाव न घेता मुख्यमंत्र्यांनी त्यांना खडसावले. ते म्हणाले की, कोणी जर राज्यात भाजपासोबत व बीड जिल्ह्यात वेगळी भूमिका घेत असेल तर अशांनी आमच्यासोबत राहू नये. भारतीय जनता पार्टी गोपीनाथ मुंडे यांच्याशिवाय पूर्ण होत नाही. सोबत राहायचं असेल तर मुंडेंसोबत अन्यथा गरज नाही. अशा शब्दात फडणवीस यांनी मेटेंचा समाचार घेतला आणि निर्वाणीचा इशारा दिला.

या सभेला जिल्हाभरातून आलेल्या लोकांनी प्रचंड गर्दी केली. वंजारी वसतिगृहाचे मैदान खचाखच भरून बाहेरचे रस्तेही गर्दीने व्यापले होते. अनेकांनी तर शेजारच्या इमारतीवर चढून सभा पाहिली. मागील अनेक वर्षाच्या काळात एवढी मोठी सभा झाली नव्हती. उच्चांकी गर्दीने ही सभा रेकॉर्डब्रेक ठरली.

Previous articleमुंडे साहेबांनी तुम्हाला आमदार केले , त्यांनाच तुम्ही धोका दिलात !
Next articleभाजपा सत्तेपासून वंचित राहू नये यासाठीच वंचित आघाडी