प्रकाश आंबेडकर आघाडीत सामील होण्याची शक्यता मावळली

प्रकाश आंबेडकर आघाडीत सामील होण्याची शक्यता मावळली

मुंबई नगरी टीम

अकोला :  भारिप बहुजन महासंघाचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी आज अकोल्यात पत्रकार परिषद घेऊन काँग्रेसबरोबर चर्चेचे प्रस्ताव संपले असल्याची घोषणा केली. त्यामुळे आंबेडकर आघाडीत सामील होण्याची शक्यता संपली आहे. आंबेडकर म्हणाले की,काँग्रेससोबत चर्चा पुढे जाणे शक्य नाही.

“आम्ही २२उमेदवार मागे घेऊ शकत नाही. १५ तारखेला संपूर्ण ४८ जागांचे उमेदवार जाहीर करु,असेही आंबेडकरांनी जाहीर केले.त्यांच्या या घोषणेमुळे प्रकाश आंबेडकर महाआघाडीत सामील होण्याच्या चर्चांना पूर्णविराम मिळाला आहे.आपली लढाई भाजप आणि शिवसेना यांच्याशी असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

प्रकाश आंबेडकर यांनी स्वतंत्र निवडणूक लढवण्याचा फटका काँग्रेस आणि राष्ट्रवादीला बसणार आहे.आंबेडकर यांचे दलित समाजात चांगले वजन असून त्यांना चांगला पाठिंबा मिळत आहे. काँग्रेसची नेमकी हीच व्होट बँक असल्याने दलित आणि मुस्लिम मतांची विभागणी अटळ आहे. त्यामुळे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण आणि छगन भुजबळ यांनी आंबेडकर यांना आघाडीत आणण्यासाठी जंग जंग पछाडले.पण आंबेडकर आपल्या जागांच्या मागणीवर ठाम राहिले. ज्या जागांवर वंचित आघाडीचे उमेदवार जाहीर केले आहेत,तेथे माघार घेण्यास आंबेडकर यांनी सपशेल नकार दिला.तितक्या जागा देणे काँग्रेसला शक्य नाही. आघाडीने फक्त अकोल्याची जागा आंबेडकर यांना देऊ केली होती.आता आंबेडकर शेवटपर्यंत आपल्या निर्णयावर ठाम राहिले तर आघाडीसाठी लोकसभा निवडणूक चांगलीच जड जाणार आहे.

 

Previous articleअखेर डॉ. सुजय विखे पाटलांचा भाजपात प्रवेश
Next articleमहाराष्ट्रात मुले पळवणारी टोळी सक्रीय :  जितेंद्र आव्हाड