अखेर डॉ. सुजय विखे पाटलांचा भाजपात प्रवेश

अखेर डॉ. सुजय विखे पाटलांचा भाजपात प्रवेश

मुंबई नगरी टीम 

मुंबई: विधानसभेतील विरोधी पक्षनेते नेते राधाकृष्ण विखे पाटील यांचे चिरंजीव डॉ. सुजय विखे-पाटील यांनी अखेर काँग्रेसला सोडचिट्ठी देत आज भाजपात प्रवेश केला आहे.मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भाजपा प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांच्या उपस्थितीत त्यांनी पक्ष प्रवेश केला. सुजय विखे यांचा पक्ष प्रवेश हा काँग्रेसला मोठा धक्का असल्याचे मानले जात असून, अहमदनगरमधून त्यांना भाजपाची उमेदवारी दिली जाणार आहे.

भाजपने आज काँग्रेसला मोठा दणका दिला आहे. विधानसभेतील विरोधी पक्षनेते नेते राधाकृष्ण विखे पाटील यांचे चिरंजीव डॉ. सुजय विखे-पाटील यांनी काँग्रेसला सोडचिट्ठी देत भाजपात प्रवेश केला.त्यांच्या पक्ष प्रवेशावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भाजपा प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे,जलसंपदा मंत्री गिरीश महाजन, महसूल मंत्री चंद्रकांत पाटील, आमदार शिवाजी कर्डिले, बबनराव पाचपुते आदी उपस्थिती होते. डॉ. सुजय विखे-पाटील यांच्या भाजपा प्रवेशानंतर सुजय विखे यांच्या नावाची अहमदनगर लोकसभा मतदारसंघासाठी शिफारस करणार असून, त्याला केंद्रीय निवडणूक समितीकडून हिरवा कंदील मिळेल असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी व्यक्त केला. अहमदनगर लोकसभा मतदारसंघातून भाजपाचा उमेदवार निवडून येईल. मुख्यमंत्र्यांचे मी  आभार मानतो असे सांगतानाच अहमदनगरमध्ये भाजपा पक्ष वाढवण्यासाठी आपण प्रयत्न करणार असल्याचे सुजय विखे-पाटील यांनी सांगितले.घरच्यांच्या विरोधात जाऊन भाजपा प्रवेशाचा निर्णय घ्यावा लागल्याची खंत त्यांनी व्यक्त केली.

डॉ. सुजय विखे-पाटील यांच्या भाजप पक्ष प्रवेशावेळी अहमदनगर जिल्ह्यातील हजारो कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते. भाजपाचा विजय असो अशा घोषणा यावेळी कार्यकर्त्यांनी दिल्या. भाजप प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी अहमद नगरमध्ये नव्या नेतृत्वाला संधी देणार असल्याचे यावेळी सांगितले. काँग्रेसला नगरची जागा सोडण्यास राष्ट्रवादीने नकार दिल्याने सुजय विखे-पाटील हे जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांच्या मध्यस्थीने भाजपाच्या संपर्कात होते.  सुजय  यांना भाजपात प्रवेश देण्यास भाजपाच्या काही आमदारांचा विरोध होता. गेल्या लोकसभा निवडणूकीत युतीला २४ जागा मिळाल्या होत्या या निवडणूकीत ४५ जागा युतीला मिळतील असा विश्वास मुख्यमंत्री फडणवीस यांनी यावेळी व्यक्त केला.

 

Previous articleमनसेचे आमदार शरद सोनावणेंचा शिवसेनेत प्रवेश
Next articleप्रकाश आंबेडकर आघाडीत सामील होण्याची शक्यता मावळली