भ्रष्टाचारी नेते भाजपमध्ये गेल्यावर स्वच्छ होतात का ? सुप्रिया सुळेंचा खोचक सवाल

मुंबई नगरी टीम

मुंबई । मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे मेहुणे श्रीधर पाटणकर यांच्या ठाण्यातील मालमत्तांवर ईडीने कारवाई केल्यानंतर राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे.यावरून आता राष्ट्रवादीच्या नेत्या आणि खासदार सुप्रिया सुळे यांनी भाजपवर हल्लाबोल करीत,भ्रष्टाचारी नेते भाजपमध्ये गेल्यावर स्वच्छ होतात का ? असा खोचक सवाल त्यांनी केलाय.

भाजपने ज्या नेत्यांवर भ्रष्टाचाराचे आरोप केले,असे नेते भाजपमध्ये गेल्यावर त्यांच्या विरोधातील ईडीची कारवाई थांबली जाते असे सांगतानाच, भ्रष्टाचारी नेते भाजपमध्ये गेल्यावर स्वच्छ होतात का, असा सवाल राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या आणि खासदार सुप्रिया सुळे यांनी उपस्थित केला आहे. तसेच कोणाच्याही विरोधात कारवाई करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भेदभाव करू नये, असे त्या म्हणाल्या.त्या दिल्लीत पत्रकारांशी बोलत होत्या.

ईडीचे छापे टाकायचे असतील तर सगळ्याच पक्षांच्या नेत्यांवर टाका,विरोधी पक्षातील नेत्यांवरच का कारवाई केली जाते, असाही प्रश्नही सुळे यांनी केला.पंतप्रधान मोदी संपूर्ण देश भ्रष्टाचारमुक्त करणार असतील तर त्यांच्या धोरणाचे स्वागत करता येईल; पण काही जणांविरोधात जाणीवपूर्वक छापे टाकले जात असतील तर त्याचा विरोधच केला पाहिजे. ईडी ( सक्तवसुली संचालनाल) आणि इतर तपास यंत्रणांची कृती योग्य नाही,असे म्हणावे लागते.विरोधी पक्षातील नेत्यांना आणि त्यांच्या कुटुंबीयांना ‘ईडीसारख्या तपास यंत्रणाच्या माध्यमातून राजकीय त्रास दिला जात असल्याचा आरोप मविआच्या नेत्यांनी केला आहे. साधी प्रश्नपत्रिका फुटली तरी त्याची चौकशी केली जाते, मग येथे तर ईडी आणि सीबीआय या तपास यंत्रणा कुणावर छापे टाकणार आहेत याची माहिती आधीच काही लोकांना कशी समजते ? असा सवालही त्यांनी केला.

Previous articleगरिबीमुळे पडेल ते काम केले ; १९ व्या वर्षी आमदाराच्या मुलीला पळवून नेऊन विवाह केला
Next articleमहावितरणचे मुख्य तपास अधिकारी सुमित कुमार निलंबित;उच्चस्तरीय चौकशी होणार