पेंग्विन गोंजारण्यापेक्षा खरे जीव वाचवा : नितेश राणे

पेंग्विन गोंजारण्यापेक्षा खरे जीव वाचवा : नितेश राणे

मुंबई नगरी टीम

मुंबई : मुंबईत सीएसटी स्थानकाला जोडणारा पूल कोसळून सहा जणांचा बळी गेल्यावर राजकीय आरोपाच्या फैरी झडण्यास सुरूवात झाली आहे. शिवसेना आणि माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांच्यातील वैर राज्याला माहीत आहे. पूल कोसळण्याच्या दुर्घटनेवरून राणे यांचे पुत्र नितेश राणे यांनी शिवसेनेला लक्ष्य करण्याची संधी घेतली आहे.दुर्घटनेनंतर पालिकेच्या ढिसाळ कामकाजावर टीका करताना आमदार नितेश राणे यांनी म्हटले आहे की, पेंग्विन गोंजारत बसण्यापेक्षा लोकांच्या जीवाची काळजी करा.

ट्विटरच्या माध्यमातून नितेश राणे यांनी शिवसेनेवर जोरदार निशाणा साधला आहे. युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांचे पेंग्विन प्रेम आणि नाईटलाईफची त्यांनी केलेली मागणी यावरून नितेश राणे यांनी शिवसेनेला टोमणा मारला आहे. पेंग्विन गोंजारत बसण्यापेक्षा आणि नाईटलाईफसाठी झगडण्यापेक्षा शिवसेनेची सत्ता असलेली पालिका खरे जीव वाचवण्याचा प्रयत्न का करत नाही ?,असा सवाल नितेश राणे यांनी केला आहे.आता पुन्हा तोच आरोप-प्रत्यारोपाचा खेळ आणि ब्रिज ऑडिटची चर्चा सुरु होईल. याचा परिणाम काहीच होणार नाही,असे ट्विट करून राणेंनी शिवसेनेला घेरले आहे.

श्रीमंत महापालिका पण आयुष्याची काही किंमत नाही,अशी खंतही त्यांनी ट्विटमध्ये व्यक्त केली आहे. आता काही अधिकाऱ्यांना निलंबित करत किंवा टार्गेट करत कमला मिल्स, एल्फिन्स्टन पूल आणि घाटकोपर इमारत दुर्घटनेप्रमाणे चौकशी बसवली जाईल,असा टोलाही नितेश राणे यांनी लगावला आहे.आता शिवसेना नितेश राणे यांना काय उत्तर देते याची उत्सुकता आहे. याआधीही नितेश राणे आणि निलेश राणे यांनी शिवसेनेला नेहमीच लक्ष्य केले आहे.आणि शिवसेनेनेही त्यांना तितकेच आक्रमक उत्तर दिले आहे.

 

Previous articleमहापौर व आयुक्तांची हकालपट्टी करा : खा. चव्हाण
Next articleनिवडणुकीत जिंकू असा विश्वास शरद पवारांना नसेल