राज्यमंत्री दिलीप कांबळे यांची तात्काळ हकालपट्टी करा

राज्यमंत्री दिलीप कांबळे यांची तात्काळ हकालपट्टी करा
मुंबई ‌नगरी टीम

मुंबई : “चौकीदार ही चोर है” ही घोषणा किती यथार्थ आहे, हे महाराष्ट्राच्या मंत्रीमंडळाकडे पाहिल्यावर समजून येते. राज्यातील दिलीप कांबळे या मंत्र्यांच्या सरकारी निवासस्थानी टोळीने लाचखोरी करून लोकांची लुबाडणूक केली जाते हे न्यायालयाने दिलीप कांबळेंवर गुन्हा दाखल करण्याच्या दिलेल्या आदेशाने सिद्ध झाले आहे. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे मंत्रीमंडळ आहे की अलीबाबा आणि चाळीस चोरांची टोळी? असा संतप्त सवाल करून मुख्यमंत्री मंत्र्यांच्या भ्रष्टाचारावर किती पांघरून घालणार अशी विचारणा करून जराही शरम वाटत असेल तर दिलीप कांबळे यांची मंत्रीमंडळातून हकालपट्टी करावी अशी मागणी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस व प्रवक्ते सचिन सावंत यांनी केली आहे.

यासंदर्भात बोलताना सावंत म्हणाले की, राज्याचा मंत्री सरकारी निवासस्थानातून आपले हस्तक व कार्यालयीन कर्मचा-यांच्या साथीने राजरोसपणे दारू दुकानाचा परवाना देण्याकरिता दोन कोटी पंधरा लाख रूपये लाच घेतली, अशी तक्रार फिर्यादी विलास चव्हाण रा. औरंगाबाद यांनी केली आहे. मंत्र्यांच्या बंगल्यावर चार वेळा मंत्री भेटले व त्यांनी लाचेची मागणी केली असेही या तक्रारीत म्हटले आहे. सदर मंत्र्यांच्या हस्तकांच्या खात्यावरही लाचेचे पैसे आले आहेत. तसेच दिलीप कांबळेंचे खासगी सचिव मनाळे यांनी ६० लाख रूपये लाचेची रक्कम कांबळे यांच्या निवासस्थानी स्विकारली. तसेच फिर्यादीच्या पत्नींच्या मालकीच्या हॉटेल माथेरानच्या बँक खात्यातूनही दिलीप कांबळे यांच्या खात्यावर १० लाख रूपये लाचेची रक्कम वर्ग करण्यात आली हे अतिशय गंभीर आहे. न्यायालयाने याची दखल घेऊन सामूहीक गुन्हेगारी अंतर्गत भारतीय दंड विधान संहितेच्या कलम ४२०, १२० ब, ४०६  आणि ३४ अन्वये गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिल्याने औरंगाबादच्या सिडको पोलीस स्थानकात मंत्री दिलीप कांबळे यांच्यासह चारही आरोपींविरोधात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. फक्त गुन्हा नोंद करून चालणार नाही तर पोलिसांनी तात्काळ मंत्री दिलीप कांबळे यांना अटक केली पाहिजे अन्यथा ते फिर्यादीवर दबाव आणू शकतात. लाचखोर मंत्र्यांना सोबत घेऊन सरकार चालवत असल्याने मुख्यमंत्र्यांनी सत्तेवर राहण्याचा नैतिक अधिकार गमावला आहे असे सावंत म्हणाले.

Previous articleबीड जिल्हयात भाजपाची दहशत : धनंजय मुंडे
Next articleमाढ्यातून रणजितसिंह नाईक निंबाळकर यांना उमेदवारी