बीड जिल्हयात भाजपाची दहशत : धनंजय मुंडे

बीड जिल्हयात भाजपाची दहशत : धनंजय मुंडे
मुंबई ‌नगरी टीम

परळी : निवडणुकीपूर्वीच पराभव होणार हे माहीत झाल्यामुळे भारतीय जनता पार्टीच्या पायाखालील वाळु घसरत चालली असल्यामुळेच त्यांनी दहशत माजवण्याचा प्रयत्न केला असल्याचा आरोप विधान परिषद विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी केला आहे.

उमेदवारी अर्जावर आक्षेप घेतला म्हणुन दादासाहेब मुंडे यांना मारहाण करणार्‍या भाजपच्या गुंडांना तात्काळ अटक करून तडीपार करण्याची मागणी त्यांनी केली आहे.

बीड लोकसभा निवडणुकीतील भाजपाच्या उमेदवार प्रितम मुंडे यांच्या उमेदवारीवर आक्षेप घेतला म्हणुन दादासाहेब मुंडे या कॉंग्रेस कार्यकर्त्यास आज बीडमध्ये जिल्हाधिकारी कार्यालयातच भाजपच्या कार्यकर्त्यांनी बेदम मारहाण केली. या घटनेचा धनंजय मुंडे यांनी तिव्र शब्दात निषेध नोंदवला आहे. लोकशाही आहे का सत्ताधारी पक्षाची हुकूमशाही ? असा सवाल उपस्थित करून लोकशाही प्रक्रियेत आक्षेपही नोंदवायचा नाही का ? सत्ताधारी भाजपाचे गुंड अशा प्रकारे दहशत करणारे असतील तर निष्पक्ष व भयमुक्त वातावरणात निवडणुका कशा होतील ? असे प्रश्‍नही त्यांनी उपस्थित केले आहेत.

दादासाहेब मुंडे यांना उमेदवारी अर्जावर आक्षेप घेतला म्हणुन झालेल्या मारहाणीची घटना अतिशय गंभीर आहे, या संदर्भात आपण निवडणुक आयोगाकडे तक्रार करणार आहोत, मारहाण करणार्‍या गुंडांना तातडीने अटक करा, संपुर्ण निवडणुक प्रक्रिया होईपर्यंत त्यांना तडीपार करा अशी मागणी मुंडे यांनी केली आहे. मारहाणीची घटना घडली तेंव्हा पोलीस बघ्याची भूमिका घेत होते, पहिल्या दिवशी पासूनच बीडचे जिल्हा पोलीस अधिक्षक आणि पोलीस भाजपाचे कार्यकर्ते असल्यासारखे वागत असून, त्यांच्यावरही कारवाई करण्याची मागणी आपण निवडणुक आयोगाकडे करणार असल्याचे मुंडे म्हणाले.

Previous articleचंद्रकांतदादा खा.राजू शेट्टींना काय म्हणाले ?
Next articleराज्यमंत्री दिलीप कांबळे यांची तात्काळ हकालपट्टी करा