माढ्यातून रणजितसिंह नाईक निंबाळकर यांना उमेदवारी
मुंबई नगरी टीम
मुंबई : माढा लोकसभा मतदारसंघातून भाजपाने अखेर सातारा काँग्रेस जिल्हाध्यक्षपदाचा राजीनामा देवून भाजपात प्रवेश केलेले रणजितसिंह नाईक निंबाळकर यांना उमेदवारी जाहीर केली आहे.आता त्यांची लढत राष्ट्रवादी काँग्रेसचे संजय शिंदे यांच्याबरोबर होईल
सातारा काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष रणजित नाईक निंबाळकर यांनी गेल्याच आठवड्यात काँग्रेसला सोडचिठ्ठी देत भाजपात प्रवेश केला आहे. माढा लोकसभा मतदारसंघातून भाजपाने रणजितसिंह नाईक निंबाळकर यांना उमेदवारी जाहीर केली आहे असल्याने राष्ट्रवादीतून भाजपामध्ये दाखल झालेले रणजितसिंह मोहिते-पाटील यांना डावलण्यात आल्याची चर्चा आहे. विजयसिंह मोहिते-पाटील हे माढा मतदारसंघात सध्या राष्ट्रवादीचे खासदार आहेत. माढा लोकसभा मतदार संघात सातारा जिल्ह्यातील फलटण, माण,खटाव,कोरेगाव तालुक्यातील उत्तर-पूर्व भागांचा समावेश आहे. या भागात रणजितसिंह नाईक-निंबाळकर यांना जनाधार आहे. तर खटावचे काँग्रेसचे आमदार जयकुमार गोरे यांचीही मदत त्यांना मिळू शकते त्यामुळेच निंबाळकर यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे.माढा लोकसभा मतदारसंघामध्ये सोलापूर जिल्ह्यातील करमाळा, सांगोला, माढा, माळशिरस या तालुक्यांसह पंढरपूर तालुक्यातील काही भागांचा समावेश आहे.
माढा मतदारसंघातून राष्ट्रवादीतून भाजपात प्रवेश केलेले माजी खासदार रणजितसिंह मोहिते पाटील यांना उमेदवारी मिळण्याची शक्यता होती.विद्यमान खासदार विजयसिंह मोहिते यांनीही भाजपकडून लढण्याची तयारी दर्शवली होती. परंतु काँग्रेस जिल्हाध्यक्षपदाचा राजीनामा देवून भाजपात प्रवेश केलेले रणजितसिंह नाईक निंबाळकर यांना येथून उमेदवारी देण्यात आली आहे. सातारा जिल्ह्यात काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांचे विळ्या भोपळ्याचे नाते आहे. विघानपरिषदेचे सभापती रामराजे नाईक निंबाळकर आणि आमदार जयकुमार गोरे यांच्यात राजकीय वैर आहे. त्यामुळेच रणजित निंबाळकर यांना उमेदवारी दिली असल्याची चर्चा आहे. रणजित निंबाळकर हे शिवसेनेचे माजी खासदार हिंदुराव नाईक निंबाळकर यांचे पुत्र असून, फलटण तालुक्यात दुग्ध व्यवसायातील बढे प्रस्थ आहे.