अंमली पदार्थ विकणाऱ्यांना थेट फाशी देण्याचा कायदा करा

अंमली पदार्थ विकणाऱ्यांना थेट फाशी देण्याचा कायदा करा

मुंबई नगरी टीम

मुंबई :  मुंबई, ठाणे, नागपूर या मोठ्या शहरानंतर आता इतर महाराष्ट्रात देखील अंमली पदार्थ सेवनाचे प्रकार वाढले आहेत. यावर जर रोख लावायचा असेल तर अंमली पदार्थ विकणाऱ्यांना थेट फाशी देण्याचा कायदा करा अशी आक्रमक मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे विधीमंडळ पक्षनेते अजित पवार यांनी आज विधानसभेत केली.

मुंबई आणि ठाणे जिल्ह्यात अंमली पदार्थांची कुरिअर आणि पोस्टामार्फत विक्री होत असल्याची लक्षवेधी सूचना आज विधानसभेत विधीमंडळ पक्षनेते अजित पवार यांनी उपस्थित केली.अंमली पदार्थांमुळे तरूण पिढी बरबाद होत आहे. महाविद्यालय असणाऱ्या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर अंमली पदार्थ विकण्याचे प्रकार वाढले आहेत. आई आणि वडील दोघेही नोकरी करत असल्यामुळे महाविद्यालयात शिक्षण घेणारा असणारा मुलगा किंवा मुलगी बाहेर काय करते हे कळत नाही ही बाब सभागृहाच्या निदर्शनास आणून देत याला रोख लावायचा असेल तर अंमली पदार्थ विकणाऱ्यांना थेट फाशी देण्याचा कायदा करा अशी आक्रमक मागणी त्यांनी केली.भाजपच्या आमदार मनिषा चौधरी यांनी अंमली पदार्थांची ‘खिशातली दुकाने’ याकडे मंत्र्यांचे लक्ष वेधले. यावर बोलताना अजितदादा पवार यांनी जनरल स्टोअर्सचे परवाने रद्द करून काहीही होणार नाही ही खिशातली दुकाने बंद करा अशी मागणीही केली.

यावर उत्तर देताना रणजीत  पाटील म्हणाले, मुंबईच्या धर्तीवर राज्यात ठाणे, पुणे व नागपूर या आयुक्तालयाच्या ठिकाणी व औरंगाबाद, नाशिक शहर, रायगड या जिल्ह्याकरीता स्वतंत्र अंमली पदार्थ विरोधी कक्ष स्थापन केले आहेत. यासंदर्भातील गुन्ह्याचे प्रकरण दिवाणी न्यायालयाऐवजी सत्र न्यायालयात चालविणे, दोन वर्षाची शिक्षा १० वर्षे तर १० वर्षाची शिक्षा २० वर्षे करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. शासनाने केलेल्या कारवाईअंतर्गत एक हजार २१ कोटी ७३ लाख २१ हजार ८५३ रूपयांचे फेंटनेल ड्रग्स जप्त करण्यात आले आहेत. मुंबई शहरात अंमली पदार्थ विरोधी कक्षामार्फत आझाद मैदान, वरळी, बांद्रा, घाटकोपर व कांदिवली हे पाच युनिट कार्यरत असून, यांच्यात वाढ करण्यात येईल. तसेच विशेष पथकासाठी मनुष्यबळ वाढविण्यात येईल. कोणताही निधी कमी पडू देणार नसल्याची माहिती पाटील यांनी यावेळी दिली.

Previous articleशासनाने एक मोठी लढाई जिंकली : मुख्यमंत्री
Next articleनाणार तेल शुद्धीकरण प्रकल्प रायगडमध्ये स्थलांतरित होणार नाही