आम्हाला जातीपातीत लढविले, विकास मात्र  “बारामतीचा” झाला!

आम्हाला जातीपातीत लढविले, विकास मात्र  “बारामतीचा” झाला!

मुंबई नगरी टीम

बीड : नेहमीच ऐनवेळी जातीवाद वाढवून जातीसाठी माती आम्हाला खायला लावायची आणि विकास मात्र बारामतीचा करायचा हे षडयंत्र यावेळी चालणार नाही. जनता आता सूज्ञ झाली असून यावेळी असले घृणास्पद डावपेच उधळून लावत ती खंबीरपणे खासदार डॉ. प्रीतम मुंडे यांच्यासोबत उभी आहे असा विश्वास पालकमंत्री पंकजा मुंडे यांनी व्यक्त केला. आडस येथील सभेत प्रचंड जनसमुदायासमोर त्या बोलत होत्या.

आडस येथे खा. प्रीतम मुंडे यांच्या प्रचारार्थ  पंकाजा मुंडे यांची सभा पार पडली. भाजपचे ज्येष्ठ नेते रमेशराव आडसकर यांनी या सभेचे आयोजन केले होते. आ. सुरेश धस, आ. संगीता ठोंबरे यांनी या सभेस उपस्थिती लावली. यावेळी बोलताना पंकजाताई म्हणाल्या की, प्रीतमताईंच्या माध्यमातून बीड जिल्हा विकासरथावर आरूढ आहे. कोणत्याही भागाच्या विकासासाठी दळणवळण यंत्रणा प्रभावी असावी लागते. त्यासाठी राष्ट्रीय महामार्ग, मुख्यमंत्री ग्रामसडक योजना आदीच्या माध्यमातून बीड जिल्ह्यात रस्त्यांचे जाळे विणले जात आहे. प्रवास जलद आणि सुखकर होत आहे. विविध योजनातून जिल्ह्यातील शेकडो ग्रामपंचायतींच्या नव्या इमारती उभारल्या जात आहेत. त्यासोबतच अनेक पंचायत समित्या, जिल्हा परिषदेचे  देखील रुपडे पालटले आहे. मागील साडेचार वर्षातील गावनिहाय प्रत्येक विकास कार्य सांगत बसले तर संपूर्ण रात्र सरून दिवस उजाडेल. राष्ट्रवादीच्या उमेदवाराच्या घरात जिल्हा परिषदेचे दोन सदस्य आहेत. त्यांनी त्यांच्या काळात केलेली असतील तर कोणतीही किमान दोन विकासकामे सांगावीत, त्या बदल्यात आम्ही केलेली वीस कामे दाखवूत. जिल्ह्याचा सर्वांगीण विकास होत असताना विरोधासाठी मुद्दे शिल्लक नसल्याने राष्ट्रवादीच्या नेत्यांनी जातीपातीचे घाणेरडे राजकारण सुरु केले आहे. विधानपरिषद निवडणुकीत आमच्या भाजपकडून सुरेश धस हे मराठा उमेदवार होते तर राष्ट्रवादीकडून रमेश कराड या वंजारी समाजातील व्यक्तीस उमेदवारी देण्याचा घाट घातला होता. त्यावेळेस यांना जात आठवली नाही का? ज्यांनी आपल्या स्वतःच्याच घरातील व्यक्तींना धोके दिले त्यांची जात कोणती होती? असे परखड सवाल पंकजा मुंडेंनी राष्ट्रवादीच्या नेत्यांना केले. विकासाची कोणतीही जात नसते हे बीड जिल्ह्यातील सूज्ञ जनता जाणून आहे, म्हणूनच ती प्रीतमताईंच्या पाठीशी खंबीरपणे उभी असून त्यांचा विजय देखील निश्चित असल्याचा विश्वास पंकजा मुंडे व्यक्त केला.

माझा जेंव्हा अपघात झाला होता तेंव्हा स्व. बाबूरावजी आडसकर यांनी फोन करून ‘पोरी काळजी घे असे आपुलकीने म्हणाले होते. विरोधकांच्या मुलीबद्दलही त्यांच्यात खूप आत्मीयता होती अशी आठवण पंकजाताईंनी सांगितली. स्व. गोपीनाथरावजी मुंडे आणि स्व. बाबूरावजी आडसकर यांच्यातील पहिल्या लढतीनंतर दोघेही परळीच्या कन्या शाळेच्या पायरीवर एकत्र गप्पा मारत बसले होते. त्यांचा हसत एकमेकांच्या हातावर टाळी देतानाचा फोटोही त्याकाळी सर्व वृत्तपत्रात छापून आला होता. मतदान झाले, आपले संबंध पाहिल्यासारखे अशा त्याकाळी लढत असायच्या. आजकाल असे चित्र पहावयास मिळत नाही अशी खंतही त्यांनी व्यक्त केली.

यापूर्वीच्या सत्ताधाऱ्यांनी बीड जिल्ह्याला कायम भकास ठेवण्याचे काम केले. मात्र, आता परिस्थिती बदलली आहे. आमच्या काळात केवळ २५-१५ च्या माध्यमातून ४५० कोटींचा निधी एकट्या बीड जिल्ह्यात आला आहे. त्यामुळे जिल्ह्याचा विकास करायचा असेल तर आपल्या मातीतीलच रत्न असावे लागते, बाहेरील लोकांच्या इशाऱ्यावर चालणारे गुलाम नकोत. शेवटी ‘आईची माया दाईला येत नसते’ हेच खरे असे उद्गार पंकजा मुंडेंनी काढले. माझी बहिण डॉक्टर असल्यामुळे विरोधकांनी डॉक्टरांची बैठक घेतली आणि प्रीतम मुंडेंना पाडा असे आवाहन केले. आता आम्हालाही असे आवाहन करायचे असल्यास थेट तुरुंगातच फेरफटका मारून बैठक घ्यावी लागेल आणि पोस्टल मतदानासाठी आवाहन करावे लागेल अशी जोरदार चपराक पंकजा मुंडेनी लगावली.

Previous articleसत्तेत तुम्ही आणि शेतीसाठी काय केले याची उत्तरे आम्ही द्यायची
Next articleगरीबी हटविण्यासाठी काँग्रेस आणि साथीदारांना हटवा