मुंडे साहेबांनी तुम्हाला आमदार केले , त्यांनाच तुम्ही धोका दिलात !
मुंबई नगरी टीम
बीड: आमच्या नेत्या तथा जिल्हयाच्या पालकमंत्री पंकजा मुंडे यांच्याबद्दल भाषा नीट वापरा अन्यथा याचे परिणाम तुम्हाला भोगावे लागतील असा थेट इशारा जिल्हा परिषदेचे समाजकल्याण सभापती संतोष हंगे यांनी आ. विनायक मेटे यांना एका प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिला आहे. ज्या मुंडे साहेबांनी तुम्हाला पहिल्यांदा आमदार केले, त्यांनाही तुम्ही धोका दिला आणि उलट आता पंकजाताईंवरच टीका करता, हे तुम्हाला शोभते का? अशा शब्दांत त्यांनी मेटेंचा समाचार घेतला.
काल झालेल्या शिवसंग्रामच्या एका मेळाव्यात पालकमंत्री पंकजा मुंडे यांच्यावर अतिशय खालच्या पातळीवर जाऊन टीका करणा-या मेटेंबद्दल सर्व सामान्य जनतेत संताप व्यक्त होत आहे. एका महिला नेतृत्वाबद्दल अशा प्रकारची भाषा करून मेटे यांनी आपल्या अकलेचे तारे तोडले आहेत असे हंगे यांनी म्हटले आहे. पंकजा मुंडे यांनी मेटे यांना त्यांच्या शिफारशी नुसार शासनाच्या विविध योजनेचा भरभरून निधी दिला, त्यांच्या समर्थकांना वेगवेगळी पदे दिली. कसलाही भेदभाव केला नाही तसेच कुठलेही कामे करतांना त्या कधी कमी पडल्या नाहीत. असे असताना त्यांच्याबद्दल राजकीय आकस ठेऊन बिनबुडाचे आरोप करणे आणि ते ही पातळी सोडून, हे कुठल्या संस्कृतीत बसते असा सवाल त्यांनी केला आहे. मुंडे साहेबांनी तुमचे राजकीय बस्तान बसवले, दुपट्यात होता तेव्हा तुम्हाला पहिल्यांदा आमदार केलं त्यांना तुम्ही धोका दिला एवढेच नव्हे तर माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांना देखील तुम्ही धोका दिला, त्यांना अवदसा आठवली म्हणून तुम्हाला पहिल्यांदा आमदार केले होते असे हंगे म्हणाले. पंकजाताई हया लोकनेत्या आहेत.सर्वाना सोबत घेऊन त्या काम करतात त्यामुळे तुम्ही त्यांच्याविषयी भाषा नीट वापरा अन्यथा याचे परिणाम तुम्हाला भोगावे लागतील असा थेट इशाराच संतोष हंगे यांनी पत्रकात दिला आहे.