भाजपा सत्तेपासून वंचित राहू नये यासाठीच वंचित आघाडी

भाजपा सत्तेपासून वंचित राहू नये यासाठीच वंचित आघाडी

मुंबई ‌नगरी टीम

 

बार्शी :  भारतीय जनता पार्टी सत्तेपासून वंचित राहू नये यासाठीच वंचित आघाडी लोकसभेच्या निवडणुकीत रिंगणात उतरली असल्याचा आरोप विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी केला. दुष्काळापेक्षा जास्त चटके शेतकऱ्यांना मोदी सरकारच्या शेतकरी विरोधी धोरणाचे बसत आहेत असा टोलाही त्यांनी लगावला.

राष्ट्रवादी काँग्रेसचे स्टार प्रचारक धनंजय मुंडे यांनी आज परभणी, उस्मानाबाद आणि सोलापूर या लोकसभा मतदारसंघातील आघाडीच्या उमेदवारासाठी एका दिवसात तब्बल पाच सभांना मार्गदर्शन केले त्यावेळी झालेल्या सभांमधून ते बोलत होते.

काँग्रेसचे ज्येष्ठ नेते  सुशीलकुमार शिंदे यांच्या प्रचारार्थ सोलापूर जिल्ह्यातील भंडारकवडे येथे झालेल्या जाहीर सभेत धनंजय मुंडे यांनी वंचित आघाडीवर जोरदार टीका केली . ही आघाडी म्हणजे भाजपाची बी टीम असून भाजपाने सत्तेपासून वंचित राहू नये यासाठीच ती कार्यरत असल्याचा आरोप त्यांनी केला.सुशीलकुमार शिंदे यांच्या सारखे नेतृत्व येथील जनतेने तळहातावरील फोडासारखे जपले पाहिजे, २०१४ साली झालेली चूक पुन्हा या निवडणुकीत करू नका असे आवाहनही त्यांनी केले. यावेळी आमदार प्रणिती ताई शिंदे याही उपस्थित होत्या.

 

उस्मानाबाद लोकसभा मतदारसंघातील राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार राणा जगजितसिंह यांच्या प्रचारार्थ भूम आणि बार्शी येथे आयोजित केलेल्या सभेत बोलताना धनंजय मुंडे यांनी या भागातील जनतेला दुष्काळापेक्षाही मोदी सरकारच्या निर्णयाचे जास्त चटके बसत असल्याचे आजच्या सभेच्या गर्दीतून दिसून येत असल्याचे सांगितले.

इथल्या शिवसेनेच्या उमेदवारच्या नावाने चिठ्ठी लिहून माझा शेतकरी आत्महत्या करतो यापेक्षा वाईट काय असू शकते. आजची भव्य सभा म्हणजे येथील शिवसेनेच्या लोकप्रतिनिधी विरुद्ध असलेली रागाची खदखद आहे असे ते म्हणाले.यावेळी माजी मंत्री आमदार दिलीप सोपल , आमदार राहूल मोटे , उमेदवार राणा जगजीत सिंग आदी उपस्थित होते.

Previous articleडाॅ. प्रितम मुंडे यांच्या प्रचार सभेसाठी अंबाजोगाईत लोटला जनसागर
Next articleनो पीएम, नो सीएम, राज्यभरात ओन्ली डीएम