नो पीएम, नो सीएम, राज्यभरात ओन्ली डीएम
मुंबई नगरी टीम
मुंबई : लोकसभा निवडणुकीची तारीख जवळ येत आहे. तस तसा राज्यात प्रचार शिगेला पोहोचत आहे. सध्या संपूर्ण राज्यात हाय व्हॉल्टेज प्रचार सुरू असून, या हाय व्हॉल्टेज प्रचारात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे नेते आणि विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे फुल डिमांडमध्ये आहेत.
आपलं मत परखडपणे मांडणारे, सोळा मंत्र्यांचे भ्रष्टाचार पुराव्यानिशी बाहेर काढून सरकारला सळो की पळो करणाऱ्या मुंडे यांना काँग्रेसकडूनही स्टार प्रचारक म्हणून मोठी पसंती मिळत असल्याचे दिसत आहे.
धनंजय मुंडे यांनी आतापर्यंत काँग्रेसच्या उमेदवाराचा प्रचार करण्यासाठी यवतमाळ-वाशिम, हिंगोली, वर्धा आणि नांदेड या मतदारसंघात सभा घेतल्या आहेत. या सभांना तुफान प्रतिसाद मिळत असल्याचे ग्राउंड रिपोर्ट सांगत आहे. त्यामुळे काँग्रेस आणि महाआघाडीचे इतर उमेदवार स्टार प्रचारक म्हणून धनंजय मुंडे यांच्या मागणी करत आहेत. मुंडे आज माजी सरंक्षण मंत्री सुशिलकुमार शिंदे यांच्या प्रचारासाठी सोलापूरात दाखल होणार आहेत. त्याचबरोबर आज परभणी, जालना, उस्मानाबाद जिल्ह्यातही ही मुंडे तोफ धडाडणार आहे. औरंगाबाद, जालना , धुळे या काँग्रेसच्या मतदार संघातही मुंडे यांना प्रचारासाठी पक्षाकडून बोलावण्यात आले आहे.
राज्यात राष्ट्रवादी काँग्रेस – कॉंग्रेसने एकत्र आघाडी करून प्रचार करण्याचे ठरवले आहे, त्यामुळे काँग्रेस – राष्ट्रवादी असे न पाहता आम्ही आघाडी म्हणून प्रचार करत आहोत. मी भाग्यवान आहे की राज्यातील दिग्गज नेत्यांच्या मतदारसंघात जाऊन मला लोकांशी संवाद साधण्याची संधी मिळत असल्याचे धनंजय मुंडे यांनी याबाबत बोलतांना सांगितले.