महायुतीला आगरी सेनेचा बिनशर्त पाठिंबा
मुंबई नगरी टीम
ठाणे : आगरी समाजाचे प्रश्न, भूमिपुत्रांच्या समस्या यांच्यासंदर्भात शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी सकारात्मक चर्चा झाल्यामुळे लोकसभा निवडणुकीत आगरी सेनेने शिवसेना-भाजप-रिपाइं महायुतीला बिनशर्त पाठिंबा देण्याचा निर्णय घेतल्याचे आगरी सेनेचे प्रमुख राजाराम साळवी यांनी शनिवारी येथे जाहीर केले.
आगरी सेनेचा प्रभाव ठाणे, मुंबई, रायगड, पालघर, नाशिक आदी जिल्ह्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर आहे. त्यामुळे आगरी सेनेच्या बिनशर्त पाठिंब्यामुळे शिवसेना-भाजप-रिपाइं महायुतीचे पारडे जड झाले आहे. देशाला स्थिर सरकारची गरज असून धडाडीचे निर्णय घेण्याची क्षमता महायुतीकडेच आहे. त्यामुळे आगरी भूमिपुत्रांच्या समस्या सोडवण्यासाठी महायुतीला बिनशर्त पाठिंबा देत असल्याचे श्री. राजाराम साळवी यांनी ठाण्यात झालेल्या पत्रकार परिषदेत सांगितले.
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी आगरी समाजाच्या प्रश्नांबाबत तपशीलवार चर्चा झाली. हे प्रश्न सोडवण्याचे आश्वासन दोघांनीही दिल्यानंतर आगरी सेनेच्या सर्व पदाधिकाऱ्यांसह चर्चा करून बिनशर्त पाठिंबा देण्याचा निर्णय घेतल्याचे श्री. साळवी म्हणाले. याप्रसंगी युवा आगरी सेनेचे प्रमुख राहुल साळवी, आगरी सेनेचे उपाध्यक्ष कैलास पाटील, सरचिटणिस मेघनाद पाटील, आगरी सेना व युवा आगरी सेनेचे विविध जिल्ह्यांमधील जिल्हाप्रमुख, तालुका प्रमुख, महिला आघाडी प्रमुख व अन्य पदाधिकारी उपस्थित होते.