गेल्या लोकसभेच्या तुलनेत यंदा मतदानाच्या टक्केवारीत वाढ
मुंबई नगरी टीम
मुंबई : देशातील लोकशाहीच्या राष्ट्रीय उत्सवाला मुंबई उपनगरातील मतदारांनी चांगला प्रतिसाद दिला. गतवर्षीच्या लोकसभा निवडणूकीत झालेल्या मतदानाच्या तुलनेत यंदा टक्केवारीत ५.५५ टक्के एवढी वाढ झाली आहे. लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीसाठी मतदार संघ, मतदान केंद्र, मतदार संख्या या बाबतीत महाराष्ट्रातील सर्वात मोठा जिल्हा असणाऱ्या मुंबई उपनगर जिल्ह्यातील अंतिम मतदान ५६.३० टक्के एवढे झाले. गेल्या निवडणुकीत हे प्रमाण ५०.७५ टक्के इतके होते. सकाळी सात पासूनच मतदारांनी आपले मतदानाचे राष्ट्रीय कर्तव्य बजावण्यासाठी रांगा लावायला सुरुवात केली यामध्ये महिला, दिव्यांग, जेष्ठ नागरिक यांच्यासह नवमतदारांनी उत्स्फुर्त प्रतिसाद दिला, अशी माहिती मुंबई उपनगर जिल्ह्याचे जिल्हाधिकारी व जिल्हा निवडणूक अधिकारी सचिन कुर्वे यांनी आज दिली.
मुंबई उपनगर जिल्ह्यातील चार लोकसभा मतदारसंघात झालेले मतदान अशाप्रकारे कंसात सन २०१४ च्या लोकसभा निवडणूकीत झालेल्या मतदानाची आकडेवारी दर्शविण्यात आली आहे : मुंबई उत्तर लोकसभा मतदारसंघ ६०.०० टक्के (५३.०७), मुंबई उत्तर पश्चिम लोकसभा मतदारसंघ ५४.२६ टक्के (५०.५७), मुंबई उत्तर पूर्व लोकसभा मतदारसंघ ५७.१५ टक्के (५१.७०), मुंबई उत्तर मध्य लोकसभा मतदारसंघ ५३.६९ टक्के (४८.६७) मुंबई उपनगर जिल्हा ५६.३०(५०.७५)
मुंबई उपनगर जिल्हयात यंदाच्या लोकसभा निवडणुकीत मतदान जनजागृतीसाठी स्वीप कार्यक्रमांतर्गत विशेष प्रयत्न करण्यात आले. यामध्ये महिला मतदारांसाठी विशेष सखी मतदान केंद्र उभारण्यात आले होते. यात २६ हजार मतदारांना कोकम सरबत देण्यात आले तर १६ हजार महिला मतदारांना सॅनिटरी पॅडचे पॅकेट देण्यात आले, एकंदरीत, सखी मतदान केंद्र हे खऱ्या अर्थाने “मतदान प्रक्रिया ही लोकशाहीचा उत्सव” असल्याचे द्योतक ठरले. दिव्यांग मतदारांसाठी विशेष सोयी सुविधा देण्यात आल्या होत्या. दिवसभरात ३०० पेक्षा जास्त दिव्यांग मतदारांसाठी वाहनांची सुविधा उपलब्ध करुन देण्यात आले, नवमतदारांसाठी सोशल मीडियाच्या माध्यमातून जनजागृती असे विविध उपक्रम राबविण्यात आले.
जिल्ह्यात काल झालेल्या चार लोकसभा मतदार संघात एकूण ८६ उमेदवार निवडणूक रिंगणात होते. त्यामध्ये मुंबई उत्तर लोकसभा मतदार संघातून १८, मुंबई उत्तर पश्चिम लोकसभा मतदारसंघातून २१, मुंबई उत्तर पूर्व लोकसभा मतदार संघातून २७ व मुंबई उत्तर लोकसभा मतदार संघातून २० उमेदवारांना मिळालेला जनतेचा कौल काल (दि.२९ रोजी ) मतदान यंत्रात सीलबंद झाला असून तो दिनांक २३ मे रोजी गोरेगांव व विक्रोळी येथे होणाऱ्या मोजणीअंती स्पष्ट होणार आहे.