वेटर ते आमदार … हनुमंत डोळस यांचा थक्क करणारा जीवनप्रवास

वेटर ते आमदार … हनुमंत डोळस यांचा थक्क करणारा जीवनप्रवास

मुंबई नगरी टीम

मुंबई : माळशिरसचे राष्ट्रवादीचे आमदार हनुमंत डोळस यांनी आज सैफी रुग्णालयात अखेरचा श्वास घेतला. त्यांनी आपल्या ५६ वर्षांच्या जीवनात अनेक चढउतार पाहिले. वेटर ते आमदार असा थक्क करणारा त्यांचा जीवनप्रवास आहे. केवळ चार महिन्याचे असताना  आईचे छत्र हरपले तर वयाच्या आठव्या वर्षी वडिलांचेही निधन झाले. त्यामुळे आठव्या वर्षीच पोरके झालेल्या हनुमंत डोळस यांचे भवितव्य अंधकारमय बनले होते.

हनुमंत डोळस यांचा जन्म १ जून १९६२ रोजी  माळशिरस तालुक्यातील दसूर या गावी झाला त्यांचे शालेय शिक्षण जिल्हा परिषद शाळेत झाले. डोळस हे चार महिन्याचे असताना आईचे निधन झाले तर शालेय शिक्षण सुरू असताना वडिलांचे छत्र हरपले. त्यामुळे बालवयातच हनुमंत डोळस हे पोरके झाले.  अशा अडचणीच्या काळात त्यांनी नातेनाईकांच्या  मदतीने शालेय शिक्षण पूर्ण केले. पुढे महाविद्यालयीन शिक्षणासाठी त्यांनी मुंबई गाठली. मुंबईत त्यांनी शिक्षणासाठी चक्क हॉटेलमध्ये वेटर म्हणून काम  करत पदवीपर्यंतचे शिक्षण पूर्ण केले. बोरीवलीत वास्तव्यास असताना माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील यांच्याशी त्यांची  जवळीक वाढली. १९८२ मध्ये ते प्रथम युवक काँग्रेसचे बोरीवली शाखेचे अध्यक्ष झाले. त्यानंतर १९९० मध्ये त्यांची म्हाडाच्या सदस्यपदी नियुक्ती करण्यात आली. राष्ट्रवादीची स्थापना झाल्यानंतर त्यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला. त्यांच्यावर प्रथम राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस म्हणून नियुक्ती करण्यात आली. त्यानंतर त्यांची चर्मोद्योग महामंडळाच्या अध्यक्षपदी  नियुक्ती करण्यात आली. मोहिते पाटील यांचे विश्वासू असणा-या डोळस यांना २००९ आणि २०१४ मध्ये माळशिरस मतदारसंघातून  राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे विधानसभेची उमेदवारी देण्यात आली.

माळशिरस या राखीव मतदारसंघ राखीव संघातून ते दोन वेळा निवडुन आले.गेल्या दोन वर्षापासून ते   कर्करोगाने त्रस्त होते. त्यांच्यावर सैफी रूग्णालयात उपचार  सुरू होते. गेल्या दोन वर्षांपासून मृत्युशी सुरू  असलेली  झुंज आज  अपयशी ठरली.

Previous articleनिवडणुका संपताच शरद पवार दुष्काळी  दौ-यावर
Next articleगेल्या लोकसभेच्या तुलनेत यंदा मतदानाच्या टक्केवारीत  वाढ