मराठी चित्रपट पुरस्कार सोहळ्याला जॉन बेली उपस्थित राहणार

मराठी चित्रपट पुरस्कार सोहळ्याला जॉन बेली उपस्थित राहणार

मुंबई नगरी टीम

मुंबई :  २६ मे रोजी होणा-या ५६ व्या राज्य मराठी चित्रपट पुरस्कार सोहळ्याला प्रमुख पाहुणे म्हणून ऑस्कर अकादमीचे विद्यमान अध्यक्ष जॉन बेली उपस्थित राहणार आहेत.वरळी येथील नॅशनल स्पोर्टस क्लब ऑफ इंडिया (एनएससीआय) येथे  पुरस्कार सोहळा आयोजित करण्यात आला आहे.

सांस्कृतिक कार्यमंत्री विनोद तावडे यांनी आज प्रसिध्दी माध्यमांच्या प्रतिनिधींशी बोलताना सांगितले की, ऑस्करच्या स्थापनेपासून ऑस्करचे कोणतेही अध्यक्ष यापूर्वी कधीच भारतात आले नव्हते. ऑस्करच्या स्थापनेपासून भारतामध्ये येणारे जॉन बेली हे पहिलेच अध्यक्ष आहेत.हे प्रथमच घडत असावे. ऑस्कर अध्यक्षांना निमंत्रित करुन मराठी चित्रपटसृष्टीतील उल्लेखनीय गोष्टी त्यांच्या मार्फत जगभरातील सिनेसृष्टीत पोहचविण्याच्या दृष्टीने हा विशेष प्रयत्न करण्यात आला आहे.

जॉन बेली हे गेली २ वर्षे ऑस्कर अकादमीचे अध्यक्ष आहेत. ऑस्कर अकादमीच्या सिनेमॅटोग्राफर विभागातून त्यांची ही निवड झाली आहे. कॅलिफोर्निया येथील “School of cinematic Art” येथून त्यांनी पदवी प्राप्त केली. १९७१ ते २०१७ पर्यंत वेगवेगळ्या ७० हुन अधिक हॉलिवूड चित्रपटांचे त्यांनी छायाचित्रण केले. तसेच हॉलिवूड चित्रपटांसाठीही त्यांनी दिग्दर्शनही केले आहे.  “American Society of cinematographers” चा जीवनगौरव पुरस्काराने प्राप्त झाला आहे. येत्या १९ मे रोजी आयोजित केलेल्या कान्स फिल्म फेस्टिव्हस मध्ये बेली यांचा विशेष गौरव होणार आहे. उज्ज्वल निरगुडकर यांनी स्वत जॉन बेली यांच्या निवासस्थानी भेट देऊन त्यांना महाराष्ट्राच्या वतीने पुरस्कार सोहळ्याचे आग्रहाचे निमंत्रण दिले आणि बेली यांनी हे निमंत्रण स्वीकारले असेही विनोद तावडे यांनी सांगितले.

गेले चार वर्ष  आम्ही वेगवेगळे प्रयत्न करत आहोत. पहिल्यांदा आम्ही मराठी सिनेमा हा “गोवा फिल्म फेस्टीव्हलला” पाठवायला सुरुवात केली. आणि जगभरातून येणाऱ्या लोकांना चांगले सिनेमे दाखवायला सुरुवात केली. मग “कान्सला” पण आपण मराठी सिनेमा पाठवायला लागलो, त्याठिकाणी विश्वातल्या वेगवेगळे डायरेक्टर्स आणि प्रोडयुसर्स यांना आपण मराठी सिनेमे दाखविण्याचा प्रयत्न करीत आहोत,असेही तावडे यांनी सांगितले.

 ऑस्कर चे अध्यक्ष जॉन बेली २५ मे व २६ मे २०१९ असे दोन दिवस मुंबईत येत आहेत. या दोन दिवसात बेली महाराष्ट्र मराठी चित्रपट सोहळ्याला उपस्थित राहणार आहेतच पण त्याव्यतिरिक्त चित्रपट सृष्टीतील संबंधितांची मान्यवरांची भेट घेणार आहेत असेही तावडे यांनी सांगितले. बेली यांच्या मुंबई भेटीचा मोठा लाभ मराठी चित्रपट सृष्टीला तर होईलच पण देशातील सर्वच चित्रपटसृष्टीलाही याचा सकारात्मक लाभ होऊ शकेल असेही तावडे यांनी स्पष्ट केले.

बेली यांच्या पत्नी कॅरॉल लिटलटन सुध्दा या प्रसंगी उपस्थित राहणार आहेत. बेली यांच्या पत्नी या व्यवसायाने फिल्म एडिटर  असून त्यांनी ३० हुन अधिक चित्रपटांचे एडिटिंग केले आहे. यामध्ये  हॉलिवूडचे सुप्रसिध्द दिग्दर्शक स्टीवन स्पिलूबर्ग यांच्या गाजलेल्या  “Et the extra-terrestrial” या चित्रपटाचा ही समावेश आहे.

राज्य मराठी चित्रपट पुरस्कार सोहळ्याचे यंदाचे ५६ वे वर्ष आहे. चित्रपट पुरस्कार सोहळ्यामध्ये मराठी चित्रपट सृष्टीतील सर्वोत्कृष्ट चित्रपट, सर्वोत्कृष्ट अभिनेता, सर्वोत्कृष्ट अभिनेत्री, सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक, सर्वोत्कृष्ट पटकथा, सर्वोत्कृष्ट विनोदी अभिनेता या पुरस्कारांचे वितरण होणार आहे. त्याचप्रमाणे व्ही.शांताराम जीवन गौरव पुरस्कार, व्ही.शांताराम विशेष योगदान पुरस्कार, राज कपूर जीवन गौरव पुरस्कार, राज कपूर विशेष योगदान जीवन गौरव पुरस्कार या सर्वोच्च पुरस्काराचे वितरण सुध्दा २६ मे रोजी होणार आहे. या पुरस्कार सोहळ्यासाठी मराठी चित्रपटसृष्टीतील नामंवत अभिनेते,अभिनेत्री, दिग्दर्शक उपस्थित राहणार आहेत. गेल्या वर्षी ज्येष्ठ विनोदी अभिनेते विजय चव्हाण यांना व्ही.शांताराम जीवन गौरव पुरस्कार, तर अभिनेत्री मृणाल कुलकर्णी यांना व्ही.शांताराम विशेष योगदान पुरस्कार, ज्येष्ठ अभिनेते धर्मेंद्र यांना राज कपूर जीवन गौरव पुरस्कार, प्रसिध्द दिग्दर्शक राजकुमार हिराणी यांना राज कपूर विशेष योगदान जीवन गौरव पुरस्काराने गौरविण्यात आले होते.

Previous articleविद्यार्थ्यांच्या भविष्याशी खेळण्याचा हक्क सरकारला कोणी दिला ?
Next articleशरद पवार यांचे दुष्काळी परिस्थितीवर मुख्यमंत्र्यांना पत्र