कोचिंग क्लासेसचे मालक  आणि विनोद तावडे यांच्यामध्ये आर्थिक देवाणघेवाण

कोचिंग क्लासेसचे मालक  आणि विनोद तावडे यांच्यामध्ये आर्थिक देवाणघेवाण

मुंबई नगरी टीम

मुंबई : कोचिंग क्लासेसचे मालक व विनोद तावडे यांच्यामध्ये मोठया प्रमाणात आर्थिक देवाणघेवाण झाल्याने खाजगी शिकवणीबाबतचा मसुदा तयार असूनही तो पडून आहे असा  खळबळजनक आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते व माजी मंत्री अनिल देशमुख यांनी पत्रकार परिषदेत आज केला.

दरम्यान याकडे शिक्षणमंत्री विनोद तावडे दुर्लक्ष करत असून यामध्ये मुख्यमंत्र्यांनी लक्ष घालून खाजगी शिकवणी मसुद्याला तात्काळ मंजुरी द्यावी अशी मागणीही अनिल देशमुख यांनी केली.सुरत येथे कोचिंग क्लासेस मध्ये भीषण आग लागण्याची दुर्दैवी घटना घडली. यामध्ये २० ते २२ लहान मुलांचा मृत्यू झाला.त्यामुळे देशात खळबळ उडाली. महाराष्ट्रात १ लाख १० हजाराच्यावर कोचिंग क्लासेस आहेत.त्यामध्ये मुंबईत ३० ते ३५ हजार कोचिंग क्लासेस आहेत. त्यांचे फायर ऑडिट होत नाही. आग लागली तर बाहेर पडायला जागा नाही. या क्लासेसवर कोणतेही निर्बंध नाही. कोणत्याही सोयी-सुविधा नाहीत असा आरोपही  देशमुख यांनी केला.

सुरतसारखी घटना महाराष्ट्रात किंवा मुंबईत घडू शकते. दुर्दैवाने अशी कोणती दुर्दैवी घटना घडली तर उपाययोजना करण्याची सोय शासनाकडे नाही असेही  देशमुख म्हणाले. २०१७ मध्ये कोचिंग क्लासेसवर नेमण्यात आलेल्या समितीवर विधानसभेत चर्चा झाली होती. १२ लोकांच्या समितीने हा मसुदा तयार केला होता. २०१८ ला शिक्षणमंत्री विनोद तावडे यांच्याकडे पाठवला होता. परंतु ते अद्याप त्याचे कायद्यात रूपांतर करु शकले नाहीत. विनोद तावडे यांनी लवकरात लवकर नवीन कायदा तयार करु असे आश्वासन नागपूरच्या हिवाळी अधिवेशनात दिले होते. परंतु त्याची अंमलबजावणी अद्याप झालेली नाही असेही  देशमुख म्हणाले.पक्षाच्यावतीने कोचिंग क्लासेसवर कायदा करावा अशी मागणी वेळोवेळी करण्यात आली आहे.मात्र सध्याचे शिक्षणमंत्री विनोद तावडे कोचिंग क्लासेसला मदत करत आहेत असेही  देशमुख यांनी सांगितले.

Previous articleविजयाचा उद्देश हा नाही की कोण अमर झाला आहे :  नवाब मलिक
Next articleगोसीखुर्द लघु सिंचन प्रकल्प २०२० पर्यंत पूर्ण करणार