बैठक महाआघाडीची मात्र चर्चा वंचित बहुजन आघाडीची

बैठक महाआघाडीची मात्र चर्चा वंचित बहुजन आघाडीची

 मुंबई नगरी टीम

मुंबई : लोकसभा निवडणुकीत मोठ्या पराभवाला सामोरे गेल्यानंतर काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस महाआघाडीच्या राज्यातील नेत्यांची महत्वपूर्ण बैठक आज येथे पार पडली. या बैठकीत नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीच्या निकालांची समीक्षा करण्यात आली व आगामी विधानसभा निवडणूक एकत्रितपणे लढविण्याबाबतही विचारविनिमय करण्यात आला मात्र या बैठकीत वंचित बहुजन आघाडीचीच चर्चा जास्त झाली.महाआघाडीमध्ये वंचित बहुजन आघाडीनेही सहभागी व्हावे, असा सुर हा आजच्या बैठकीचा होता.

नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर आज महाआघाडीच्या नेत्यांची बैठक विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांच्या निवासस्थानी झाली. या बैठकीत पराभवर चर्चा करण्यात आली मात्र महाआघाडीला पराभवास कारणीभूत ठरलेल्या वंचित बहुजन आघाडीवरच जास्त चर्चा झाल्याचे समजते.लोकसभा निवडणुकीत भाजपच्या विरोधात सभा घेवून भाजप विरोधी वातावरण निर्माण करणा-या महाराष्ट्र  नवनिर्माण सेनेला महाआघाडीत घ्यायचे की नाही, याबाबत आजच्या बैठकीत चर्चा झाली नाही.लोकसभा निवडणुकीचे निकाल आणि आगामी विधानसभा निवडणूक यावर या बैठकीत चर्चा झाली. महाआघाडीच्या पहिल्या बैठकीत आगामी निवडणूक सर्वांनी एकत्र येऊन लढायचे ठरले असून, यासंदर्भात आणखी बैठकी होतील. विखे पाटील यांच्यासोबत आणखी काही आमदार भाजपात जातील असे वाटत नाही. ज्या आमदारांनी पक्षविरोधी कारवाया केल्या, त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल, असे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी सांगितले .

राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यावेळी म्हणाले की, लोकसभा निवडणुकीच्या निकालाच्या अनुषंगाने इव्हीएमबाबत लोकांच्या मनात शंका आहे. महाआघाडीमध्ये वंचित बहुजन आघाडीनेही सहभागी व्हावे, असे आम्हाला वाटते. मात्र त्यांनी लोकसभा निवडणुकीच्या वेळी दिलेला प्रतिसाद लक्षात घेता त्याबाबत अजून चर्चा झालेली नाही. मनसेला महाआघाडीत घ्यायचे की नाही, याबाबत आज चर्चा झालेली नसल्याचे त्यांनी एका प्रश्नाचे उत्तर देताना सांगितले.

या बैठकीला काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण,राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आ. जयंतराव पाटील, राष्ट्रवादी विधीमंडळ पक्षनेते आ. अजित पवार, ज्येष्ठ नेते आ. छगन भुजबळ, विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे,माजी विधानसभा अध्यक्ष दिलीप वळसे पाटील,विधानसभेतील काँग्रेसचे उपनेते विजय वडेट्टीवार, राष्ट्रीय सरचिटणीस खा. सुनिल तटकरे,सपाचे नेते आ. अबू आझमी,युवा स्वाभिमान पक्षाचे आ. रवी राणा, आमदार हसन मुश्रीफ,आ. बाबाजानी दुर्राणी, शेकापचे नेते आ. जयंत पाटील, शेकापचे नेते आ. गणपतराव देशमुख,सीपीआयचे नेते प्रकाश रेड्डी,काँग्रेसचे नेते माजी मंत्री आ. नसीम खान, बविआचे आ. हितेंद्र ठाकूर, विधानपरिषदेतील काँग्रेस पक्षाचे आ. शरद रणपिसे, आ. जोगेंद्र कवाडे,गवई गटाचे राजेंद्र गवई, आ. हेमंत टकले,आ. अनिकेत तटकरे आदींसह आघाडीचे नेते उपस्थित होते.

 

Previous article१८ जून रोजी राज्याचा अर्थसंकल्प सादर होणार
Next articleराज्यात कृत्रिम पाऊस पाडणार