निवडणूकांमुळे विद्यार्थी चळवळीला बळ मिळेल

निवडणूकांमुळे विद्यार्थी चळवळीला बळ मिळेल

मुंबई नगरी टीम

मुंबई :  विद्यार्थ्यांमधील नेतृत्वगुण विकसित होण्याच्या दृष्टिने विद्यार्थी परिषदेच्या निवडणूका महत्वपूर्ण असून, या निवडणूकांमुळे विद्यार्थी चळवळीला बळ मिळेल असा आशावाद राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी व्यक्त केला.

आज मुंबई विद्यापीठात आयोजित करण्यात आलेल्या विद्यार्थी परिषद निवडणूक कार्यशाळेच्या उदघाटनप्रसंगी उपस्थितांना  तावडे मार्गदर्शन करत होते. उच्च शिक्षण संचालनालय पुणे व मुंबई विद्यापीठाच्या सयुंक्त विद्यमाने आज मुंबई विद्यापीठाच्या दीक्षान्त सभागृहात विद्यार्थी परिषद निवडणूक कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. विद्यार्थी  परिषदेच्या निवडणूका घेण्यामागची पार्श्वभूमी विशद करतांना शिक्षणमंत्री तावडे म्हणाले की, सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतरही महाराष्ट्रात महाविद्यालयीन निवडणूका होत नव्हत्या. मात्र राज्य सरकारने महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांना महाविद्यालयीन निवडणूकांमधून  खऱ्या अर्थाने नेतृत्वाची संधी मिळावी व लोकशाही मार्गाने सार्वत्रिक मतदानाच्या माध्यमातून पुन्हा एकदा कॅम्पसवर विद्यार्थ्यांना नेतृत्व करण्यास वाव मिळावा यासाठी राज्यशासनाच्या वतीने विद्यार्थी परिषदेच्या निवडणूकीचे एकरुप परिनियन तयार करण्यात आले आहेत.

 विद्यार्थी परिषदेच्या निवडणूकांमुळे नेतृत्वगुण विकासाला चालना मिळणार आहे. उमेदवार विद्यार्थ्यांना आपल्या मतदारांसमोर स्वतःची भूमिका मांडावी लागेल. विद्यार्थ्यांच्या विकासासाठी कटीबद्ध असणारे विद्यार्थी मंडळ तयार होईल असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले. विद्यार्थ्यांकडे प्रचंड उर्जा असते, ही उर्जा योग्य रितीने वापरली गेल्यास खूप सकारात्मक बदल घडू शकतो, असेही त्यांनी नमुद केले. त्यांनी यासाठी त्यांचा पंढरपूरच्या वारीतील अनुभव विशद करतांना शिस्त व स्वच्छता राखण्यासाठी मदत करणाऱ्या राष्ट्रीय सेवा योजनेच्या हजारो स्वयंमसेवकांचा आवर्जून उल्लेख केला. विद्यार्थी परिषदेच्या निवडणूकांमधून विद्यार्थी विकासाकडे सर्वांनी लक्ष देण्याचे आवाहनही त्यांनी यावेळी केले.कार्यशाळेला मार्गदर्शन करतांना मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. सुहास पेडणेकर यांनी विद्यार्थी परिषदेच्या निवडणूकातून तरुणांतील नेतृत्व गुण विकासाला चालना मिळणार असून देशाच्या विकासासाठी त्यांचे मोठे योगदान लाभणार असल्याचे त्यांनी सांगितले. या निवडणूकांकडे शिक्षणाचा एक भाग म्हणून पाहावे असेही त्यांनी यावेळी नमूद केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविकपर भाषण करतांना राज्याचे उच्च शिक्षण संचालक डॉ धनराज माने यांनी विद्यार्थी परिषदेच्या निवडणूका घेण्यामागची पार्श्वभूमी विशद करुन अशा प्रकारच्या कार्यशाळांचे आयोजन प्रत्येक विद्यापीठांनी सलंग्नित महाविद्यालयांसाठी विद्यापीठ स्तरावर करणे गरजेचे असल्याचे सांगितले.

Previous articleआज देशात सांप्रदायिक विचाराचा ज्वर पहायला मिळत आहे     
Next articleमहालक्ष्मी बाणगंगा मंदिर परिसराचा होणार कायापालट