महालक्ष्मी बाणगंगा मंदिर परिसराचा होणार कायापालट

महालक्ष्मी बाणगंगा मंदिर परिसराचा होणार कायापालट

मुंबई नगरी टीम

मुंबई :  मुंबईतील प्रसिद्ध महालक्ष्मी मंदिर तसेच बाणगंगा मंदिर परिसराचा कायापालट केला जाणार आहे. यासंदर्भात मुंबईचे पालकमंत्री सुभाष देसाई यांच्या अध्यक्षतेखाली आज मंत्रालयात संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांसमवेत बैठक पार पडली. यावेळी मंदिर परिसरातील प्रस्तावित सुधारणांचा आढावा घेण्यात आला.

महालक्ष्मी मंदिर परिसरात दररोज दहा हजारांहून अधिक भाविक दर्शनासाठी येतात. तर नवरात्री उत्सवात येणाऱ्या भाविकांची संख्या रोजची लाखापलीकडे असते. त्यांना मूलभूत सुविधा उपलब्ध व्हाव्यात, यावर आजच्या बैठकीत चर्चा करण्यात आली. भाविकांसाठी सभागृह, प्रतीक्षा दालन उभारणे, चप्पल स्टँड, सरकते जिने बसविणे, अतिक्रमण रोखण्यासाठी कुंपन भिंत मजबूत करणे, मंदिरात जाण्यासाठी असलेला मार्ग प्रशस्त करणे, याशिवाय किनारपट्टीकडील भागात रस्ता करण्यासाठी कोस्टलरोड प्रशासनास आवाहन करणे, मंदिरात येणाऱ्या भाविकांना देवीच्या दर्शनासाठी प्रवेश व बाहेर पडण्यासाठी रस्ता तयार करणे आदी विषयांवर चर्चा करण्यात आली. किनाऱ्यालगतच्या पात्र झोपड्यांचे स्थलांतर करण्यावर यावेळी चर्चा करण्यात आली. मंदिर परिसरातील दुकाने एका रांगेत आणण्याचे काम हाती घेण्यात आले असून यासाठी मुंबई महापालिका निधी उपलब्ध करून देणार आहे. सध्याच्या प्रसाधानगृहांची पुनर्बांधणी करण्याचे विश्वस्त संस्थेने यावेळी मान्य केले.

या शिवाय बाणगंगा देवस्थान परिसरातील अतिक्रमणे पुरातत्व विभाग, महापालिका, पोलिस प्रशासन व जिल्हा प्रशासन यांच्या मदतीने काढण्याच्या सूचना यावेळी करण्यात आल्या. यापुढील काळात अतिक्रमण होऊ नयेत, यासाठी पुरातत्व विभागाने कडक सुरक्षा व्यवस्था तैनात करावी, असे या वेळी सूचवण्यात आले.बाणगंगा हे तिर्थाटन असल्याने मंदिराचा जिर्णोद्धार करून संरक्षक भिंत, रस्ते, साफसफाईचे काम हाती घेण्याच्या सूचना यावेळी करण्यात आल्या. या शिवाय बाणगंगा तलावातील पाण्याचे शुद्धीकरण केले जाणार आहे. त्यासाठी संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांना सूचना करण्यात आल्या. बाणगंगा तलाव परिसरात अतिक्रमण झालेल्या झोपड्यांमधील अवैध वीज जोडण्या बेस्टेने रद्द करणे, आरपीजी फाऊंडेशनच्यावतीने या भागाचे सौंदर्यीकरण करण्यासंदर्भात माहिती देण्यात आली.

Previous articleनिवडणूकांमुळे विद्यार्थी चळवळीला बळ मिळेल
Next articleगेल्या सहा महिन्यांपासून धर्मादाय आयुक्त पद रिक्त