सुभाष देसाईंचा पत्ता कट ? ; विधानपरिषदेसाठी शिवसेना,भाजप,काँग्रेस,राष्ट्रवादीकडून ‘या’ नावांची चर्चा

मुंबई नगरी टीम

मुंबई । विधानपरिषदेच्या निवडणुकीसाठी येत्या २० जून रोजी निवडणूक होत असून, उमेदवारी अर्ज दाखल करण्याची शेवटी तारीख ९ जून असल्याने १० जागांसाठी उमेदवारांची नावांची घोषणा उद्या ( बुधवारी ) करण्यात येणार आहे. शिवसेनेकडून उद्योगमंत्री सुभाष देसाई यांच्या ऐवजी नंदुरबारचे शिवसेना जिल्हा प्रमुख आमश्या पाडवी यांना उमेदवारी दिली जाण्याची शक्यता आहे.तर सेनेकडून दुस-या जागेवर माजी राज्यमंत्री सचिन अहिर यांना संधी दिली जाईल.राज्यसभेचा निकाल काय लागतो त्यावर ही निवडणूक बिनविरोध होणार की नाही हे अवलंबून आहे.

राज्यसभेच्या निवडणुकीनंतर येत्या २० जून रोजी होणा-या विधानपरिषदेच्या निवडणुकीत कोणाला संधी देणार याकडे लक्ष लागले आहे. येत्या १० तारखेला होणारी राज्यसभेची निवडणूक चुरशीची होणार आहे.त्याची जुळवाजुळव सुरू असतानाच आता विधानपरिषेच्या निवडणूकीची रणधुमाळी सुरू झाली आहे.राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि सभापती रामराजे नाईक निंबाळकर, राष्ट्रवादी काँग्रेसचे संजय दौंड, शिवसेनेचे नेते आणि उद्योगमंत्री सुभाष देसाई,दिवाकर रावते,विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर,सदाभाऊ खोत,विनायक मेटे,सुजितसिंह ठाकूर,प्रसाद लाड हे सदस्य निवृत्त होत आहेत.तर भाजपचे रामनिवास सिंह यांचे निधन झाल्याने एक जागा रिक्त आहे.या रिक्त १० जागांपैकी ६ जागा महाविकास आघाडीच्या तर ४ जागा भाजपच्या वाट्याला येणार आहेत.त्यामुळे सर्वच पक्षांमध्ये उमेदवारी मिळवण्यासाठी मोठी चुरस आहे.राष्ट्रवादीकडून दोन जागांसाठी सभापती रामराजे नाईक निंबाळकर आणि भाजपमधून राष्ट्रवादीत प्रवेश केलेले माजी मंत्री एकनाथ खडसे यांना संधी दिली जाण्याची शक्यता आहे.शिवसेनेकडून ज्येष्ठ नेते आणि विद्यमान उद्योगमंत्री सुभाष देसाई यांना संधी मिळण्याची शक्यता नाही.शिवसेनेकडून दोन जागांसाठी माजी राज्यमंत्री सचिन अहिर आणि नंदुरबारचे जिल्हाप्रमुख आमश्या पाडवी यांना उमेदवारी दिली जाणार असल्याची चर्चा आहे.आमश्या पाडवी यांनी गेल्या विधानसभा निवडणुकीत आदिवासी विकासमंत्री के.सी पाडवी यांच्या विरोधात निवडणूक लढवली होती.

काँग्रेसच्या वाट्याला येणा-या दोन जागांसाठी मुंबईचे अध्यक्ष भाई जगताप,माजी राज्यमंत्री बसवराज पाटील आणि माजी मंत्री नसीम खान यांच्या नावाची चर्चा आहे.आगामी मुंबई महानगरपालिका निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर भाई जगताप यांना काँग्रेसकडून संधी दिली जाण्याची शक्यता आहे.तर दुस-या जागेवर पक्ष संघटना बांधणीत योगदान देणारे बसवराज पाटील यांच्या नावाची जोरदार चर्चा आहे.भाजपच्या वाट्याच्या चार जागांसाठी भाजपकडून विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांची उमेदवारी नक्की मानली जात आहे.माजी मंत्री पंकजा मुंडे यांनीही उमेदवारीसाठी दावा केल्याने त्यांना संधी दिली जावू शकते.उरलेल्या दोन जागांसाठी माजी मंत्री राम शिंदे,उत्तर भारतीय नेते कृपाशंकर सिंह, प्रसाद लाड यांच्यासह श्रीकांत भारतीय यांच्या नावाची चर्चा आहे.गुरूवारी ९ जून रोजी उमेदवारी अर्ज दाखल करण्याची शेवटची तारीख असल्याने उद्या बुधवारी उमेदवारांच्या नावांची अधिकृत घोषणा करण्यात येणार आहे.१० जून रोजी होणारी राज्यसभेची निवडणूक अत्यंत चुरशीची होणार आहे. या निवडणुकीत महाविकास आघाडीचा सहावा उमेदवार विजयी झाल्यास विधानपरिषेदची निवडणूक बिनविरोध होण्याची शक्यता आहे.

Previous articleजिल्हा परिषद निवडणुकीला मला साहेबांनी उभे केले अन…धनंजय मुंडेंनी दिला काकांच्या आठवणींना उजाळा
Next articleमोठी बातमी : महाविद्यालयांना ५० टक्के पद भरतीला परवानगी