जिल्हा परिषद निवडणुकीला मला साहेबांनी उभे केले अन…धनंजय मुंडेंनी दिला काकांच्या आठवणींना उजाळा

मुंबई नगरी टीम

परळी । स्व. गोपीनाथराव मुंडे साहेब हे आज हयात असते तर मागच्या ५-६ वर्षात महाराष्ट्राच्या राजकारणात जे बदल घडले आहेत, ते कदाचित घडले नसते, राजकारणातील सौहार्द कायम टिकून राहिले असते,असे मत व्यक्त करतानाच,साहेबांनी पट्टीवडगाव गटातून मला उमेदवारी दिली,मी विजयी झालो आणि माझ्या राजकीय जीवनाची खऱ्या अर्थाने सुरुवात झाली,अशी आठवण राज्याचे सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांनी सांगितली.

आज गोपीनाथगड (पांगरी) ता. परळी येथे दिवंगत नेते स्व. गोपीनाथराव मुंडे यांच्या ८ व्या स्मृतिदिनानिमित्त धनंजय मुंडे यांनी गोपीनाथगडावरील स्मृतिस्थळी अभिवादन केले.यावेळी त्यांनी अनेक आठवणींना उजाळा दिला. मी स्व. मुंडे साहेबांसोबत अनेक वर्ष सावलीसारखा सोबत राहिलो, त्यांच्या संघर्षाच्या काळात देखील मी क्षणोक्षणी सोबत होतो, असे त्यांनी सांगितले.स्व. मुंडे साहेब हे सर्व सामान्य माणसाच्या प्रश्नांशी नाळ जोडलेले व्यक्तिमत्व होते, ऊस तोड कामगारांच्या प्रश्नांवर त्यांनी संघर्ष केला, त्यांचा बीड जिल्ह्यातील सर्व सामान्य माणसाची प्रगती, ऊस तोड कामगारांचे कल्याण हे स्वप्न उराशी बाळगुनच मी काम करतो आहे; ऊसतोड कामगार महामंडळाची अधिकृत स्थापना देखील झाली असून, आता कामगारांसाठी विविध योजनांच्या माध्यमातून प्रगतीचे स्वप्न देखील पूर्ण करणार असल्याचा निर्धार धनंजय मुंडे यांनी व्यक्त केला. स्व. गोपीनाथराव मुंडे साहेबांनी माझे वडील, पंडित अण्णा मुंडे यांच्याशी माझ्या जिल्हा परिषद निवडणूक उमेदवारी साठी अक्षरशः वाद घातला, पण ते स्वतः १९७८ साली लढले, त्याच पट्टीवडगाव गटातून मला उमेदवारी दिली, मी विजयी झालो आणि माझ्या राजकीय जीवनाची खऱ्या अर्थाने सुरुवात झाली, अशी आठवण सांगताना धनंजय मुंडे भावुक झाले होते.
आजही त्यांचा आवाज माझ्या कानात घुमतो…

धनंजय मुंडे यांनी सकाळी ‘अप्पा आजही तुमचा आवाज माझ्या कानात घुमतो’ अशा आशयाचे ट्विट करून स्व. मुंडे साहेबांना आदरांजली अर्पण केली होती, याबद्दल माध्यमांनी विचारले असता, धनंजय मुंडे म्हणाले, ‘होय, सर्व सामान्य माणसाच्या प्रश्नांची उकल करून त्यांना न्याय देणारा स्व. मुंडे साहेबांचा आवाज होता, आम्हाला त्यांनी तीच शिकवण दिली व तीच शिकवण आम्ही अंगीकृत केली, आजही सर्व सामान्य माणसाच्या न्यायासाठीचा त्यांचा तो आवाज माझ्या कानात घुमतो…’

Previous article“जिथे मुंडे साहेबांचा सत्कार करायचा होता तिथे अंत्यविधी करावा लागला” : पंकजा मुंडे झाल्या भावुक
Next articleसुभाष देसाईंचा पत्ता कट ? ; विधानपरिषदेसाठी शिवसेना,भाजप,काँग्रेस,राष्ट्रवादीकडून ‘या’ नावांची चर्चा