विद्यमान मंत्री,सभापती,विरोधी पक्षनेत्यांसह १० आमदारांची मुदत येत्या जुलैमध्ये संपणार

मुंबई नगरी टीम

मुंबई । राज्याचे उद्योगमंत्री सुभाष देसाई,विधानपरिषदेचे सभापती रामराजे नाईक निंबाळकर,विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते प्रविण दरेकरांसह विधानपरिषदेतील १० आमदारांची मुदत येत्या ७ जुलै २०२२ रोजी संपत आहे.तर ठाणे स्थानिक प्राधिकरण संस्थामधून विधानपरिषदेवर गेलेले शिवसेनेचे आमदार रविंद्र फाटक यांची मुदत येत्या ८ जून रोजी संपत आहे.सध्या असणारे संख्याबळ पाहता भाजपकडून कोणाला संधी दिली जाते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

विधानसभा सदस्यांद्वारे निवडून दिलेल्या विधानपरिषदेतील १० आमदारांची मुदत येत्या ७ जुलै २०२२ रोजी संपत आहे.त्यामध्ये विधानपरिषदेचे सभापती रामराजे नाईक निंबाळकर,राज्याचे उद्योगमंत्री आणि शिवसेना नेते सुभाष देसाई,विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर,माजी मंत्री आणि शिवसेनेचे नेते दिवाकर रावते,भाजपचे आमदार प्रसाद लाड,सुरजितसिंह ठाकूर विनायक मेटे,सदाशिव खोत,राष्ट्रवादीचे आमदार संजय दौंड यांचा समावेश आहे.भाजपचे आमदार रामनिवास सत्यनारायण सिंह यांच्या निधनामुळे एक जागा रिक्त असून,त्यांचीही मुदत येत्या ७ जुलै रोजी संपत आहे.ठाणे स्थानिक प्राधिकरण संस्थामधून विधानपरिषदेवर गेलेले शिवसेनेचे आमदार रविंद्र फाटक यांची मुदत येत्या ८ जून रोजी संपत आहे.

विधानसभेतील संख्याबळ
शिवसेना – ५६
राष्ट्रवादी काँग्रेस -५३
काँग्रेस -४३ ( कोल्हापूर उत्तरचे आमदार चंद्रकांत जाधव यांच्या निधनामुळे एक जागा रिक्त )
भाजप-१०६
बहुजन विकास आघाडी-३
समाजवादी -२
एम.आय.एम.-२
प्रहार जनशक्ती-२
मनसे-१
क्रांतिकारी शेतकरी पक्ष-१
जनसुराज्य शक्ती पक्ष-१
शेकाप-१
राष्ट्रीय समाज पक्ष-१
कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडीया ( मार्क्सवादी ) -१
अपक्ष १३

राज्यात महाविकास आघाडीचे सरकार असून,बहुमतावेळी या सरकारला १७० आमदारांचा पाठिंबा असल्याचे स्पष्ट झाले होते.त्यामुळे महाविकास आघाडीला विधानपरिषदेवर ५ जणांना पाठविण्याची संधी मिळू शकते.काही अपक्ष आमदार आणि अन्य पक्षाच्या पाठिंब्यावर महाविकास आघाडी सहावी जागा जिंकू शकते.विधानपरिषदेतील रिक्त होणा-या एकूण जागापैकी भाजपच्या वाट्याच्या ६ जागा रिक्त होत आहेत.त्यापाठोपाठ शिवसेना आणि राष्ट्रवादीचे प्रत्येकी २ आमदार निवृत्त होत आहे.भाजपचे सख्याबळ पाहता आणि त्यांना अपक्ष आणि छोट्या पक्षांची साथ मिळाल्यास भाजपचे ४ आमदार विधानपरिषदेवर जावू शकतात.विधानपरिषदेतील विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांची विधानपरिषदेतील कामगिरी पाहता त्यांना दुस-यांदा संधी दिली जावू शकते.विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांचे विश्वासू आमदार अशी ओळख असलेले प्रसाद लाड यांच्याही नावाचा विचार होवू शकतो.काही अपक्ष आणि इतर पक्षांनी भाजपला साथ दिली असल्याने हे पक्ष भाजपकडे जागांची मागणी करण्याची शक्यता असल्याने विधानपरिषदेची उमेदवारी देताना भाजपच्या नेत्यांना तारेवरची कसरत करावी लागणार आहे.शिवसेनेकडून विद्यमान आमदार सुभाष देसाई यांना संधी दिली जावू शकते. तसेच अभिनेते आणि शिवसेना उपनेते आदेश बांदेकर यांनाही संधी दिली जाण्याची शक्यता आहे.विधानसभा सदस्यांद्वारे निर्वाचित विधानपरिषदेतील १० आमदारांची मुदत येत्या ७ जुलैला तर ठाणे स्थानिक प्राधिकरण संस्थामधून विधानपरिषदेवर गेलेले शिवसेनेचे आमदार रविंद्र फाटक यांची मुदत येत्या ८ जून रोजी संपत असल्याने या निवडणुका जून मध्ये होण्याची शक्यता आहे.

Previous articleअटकपूर्व जामिनासाठी प्रविण दरेकरांना सत्र न्यायालयात अर्ज करण्याची मुभा
Next articleराज्यसभेच्या ६ जागा रिक्त होणार; संजय राऊतांना चौथ्यांदा संधी मिळणार