मुंबई जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या अध्यक्षपदी आ.प्रविण दरेकर यांची बिनविरोध निवड

मुंबई नगरी टीम

मुंबई । मुंबई जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या आज झालेल्या निवडणुकीत भाजपचे नेते,आमदार प्रविण दरेकर यांची बँकेच्या अध्यक्षपदी बिनविरोध निवड करण्यात आली आहे.तर उपाध्यक्षपदी सिध्दार्थ कांबळे यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे.

मुंबई जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संचालक मंडळाची सभा आज पार पडली.या सभेमध्ये निवड प्रक्रिया पार पडली. या निवड प्रक्रियेत भाजपचे नेते व आमदार प्रविण दरेकर यांची अध्यक्षपदी तर सिध्दार्थ कांबळे यांची उपाध्यक्षपदी बिनविरोध निवड करण्यात आली.सहकारामध्ये एखादी संस्था चालवित असताना तिची सर्वार्थाने उन्नती होण्यासाठी सर्व सहका-यांनी सर्वांनी एकोप्याने व एकत्रितपणे काम करावे लागते हा सहकाराचा खरा मूलमंत्र आहे. गेली सुमारे २० वर्ष सर्व मंडळी सहकारात एकत्रितपणे काम करत आहोत. कुठल्याही पक्षाचे सरकार असले तरी यापूर्वी बँकेचे नेतृत्व करताना आज बँक सर्वांच्या प्रयत्नातून दहा हजार कोटी पर्यंत आम्ही एकत्रितपणे आणली आहे. निवडणुकीच्या काळात थोड्याफार काही गोष्टी झाल्या होत्या, परंतु शेवटी आमचा स्नेह एवढा घट्ट आहे की पुन्हा त्या सगळ्या दुरुस्त्या करत शिवाजीराव नलावडे यांच्या मार्गदर्शनाखाली आमचे आमदार प्रसाद लाड, सुनील राऊत सगळे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी माझ्यावर पुन्हा जबाबदारी सोपविली. माझ्यासोबत सिद्धार्थ कांबळे यांनी काम करावे अशी मी अपेक्षा व्यक्त केली. कारण शेवटी वेळ देणे काम करणे व यासाठी चांगला साथीदार आवश्यक आहे, तरच आपल्याला संस्थेची योग्य पध्दतीने वाढ करता येते.सिध्दार्थ कांबळे त्यांनीही ही विनंती मान्य केली.असे प्रविण दरेकर यांनी सांगितले.

राजकारणात पक्षापलीकडे मैत्री आणि संबंध असतात आणि मला वाटते ते गैर असण्याचे काहीच कारण नाही.त्यामुळे बँकेच्या हितासाठी जर पक्षापलीकडे जाऊन आम्ही एकत्र आल्यामुळे मुंबईतल्या आमच्या सगळ्या सहकारी कार्यकर्त्यांना सुद्धा याचा प्रचंड आनंद झाल्याचे आपल्याला दिसून येईल असे दरेकर यांनी सांगितले.सहकारामध्ये कुठल्याही पक्षाचे चिन्ह नसते. सहकारामध्ये विविध पक्षांचे कार्यकर्ते अनेक जिल्हा बँकांमध्ये काम करताना दिसतात.सहकारामध्ये एकत्रित काम करुन वाटचाल करायची असते. म्हणूनच आजची निवड ही बिनविरोध झाली. आज सरकारच्या माध्यमातून बँकेला सहकार्य होईल, तसेच बँकेची प्रगती अधिक ताकदीने होईल.हा विचार फार महत्त्वाचा असून हाच विचार सहकारात जोपासला गेला पाहिजे असेही दरेकर यांनी सांगितले.

Previous articleराज्यातील २५ जिल्हा परिषद आणि २८४ पंचायत समित्यांच्या निवडणुकांना स्थगित
Next articleप्रभाग रचना : उद्धव ठाकरेंच्या स्‍वभावाचा फायदा घेत एकनाथ शिंदेंचा विरोध डावलून घेतला निर्णय