अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर विरोधी पक्ष आक्रमक रणनीती ठरवणार
मुंबई नगरी टीम
मुंबई : राज्य विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनास सोमवार १७ जून पासून सुरुवात होत असून, या अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर अधिवेशनातील रणनीतीवर चर्चा करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस – कॉंग्रेस व इतर सर्व विरोधी पक्षांच्या गटनेत्यांची बैठक उद्या रविवार १६ जून रोजी आयोजित करण्यात आली आहे.
विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांच्या मंत्रालयासमोरील बी – ४ या शासकीय निवासस्थानी सकाळी अकरा वाजता विरोधी पक्षांच्या गटनेत्यांची बैठक होणार असून, त्यानंतर पत्रकार परिषदेला संबोधित करणार आहेत. अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर सरकारच्या वतीने सायंकाळी चहापानाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे , या चहापानाला उपस्थित राहायचे की नाही यावर या बैठकीत चर्चा होणार आहे याशिवाय अधिवेशनातील रणनीती संदर्भात चर्चा होऊन रणनिती ठरणार आहे.
लोकसभा निवडणुकीत विरोधी पक्षांना राज्यात म्हणावे असे यश मिळाले नसले तरीही त्यांनी विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर पुन्हा एकदा कंबर कसली आहे. राज्यातील दुष्काळ, मंत्र्यांचे भ्रष्टाचार, ढासाळलेली कायदा व सुव्यवस्था , शिक्षणातील गोंधळ आरक्षणाचे रखडलेले प्रश्न , यासह अनेक प्रश्नांवर विरोधी पक्ष सरकारला धारेवर धरू शकतात.