भाजपच्या या “तीन मंत्र्यांना” डच्चू मिळणार
मुंबई नगरी टीम
मुंबई : राज्य मंत्रिमंडळाचा उद्या विस्तार होणार असून, गृहनिर्माणमंत्री प्रकाश मेहता, आदिवासी विकासमंत्री विष्णू सावरा आणि आदिवासी विकास राज्यमंत्री अंबरिश अत्राम यांना मंत्रिमंडळातून वगळण्यात येणार असल्याचे सूत्रांकडून समजते. भाजपच्या काही मंत्र्यांना मंत्रिमंडळातून वगळण्यात येणार असले तरी शिवसेनेच्या मंत्र्यांना अभय मिळणार आहे.
अखेर मंत्रिमंडळाच्या विस्ताराला मुहूर्त सापडला असून,अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर होणा-या या विस्तारात अडचणीचे ठरलेले राज्याचे गृहनिर्माणमंत्री प्रकाश मेहता यांना डच्चू देण्यात येणार आहे. ताडदेव येथील एम. पी. मिल कम्पाऊंड प्रकरणी गृहनिर्माणमंत्री मेहता यांचा कारभार पारदर्शी नसल्याचा ठपका लोकायुक्त एम. एल. ताहलियानी यांनी आपल्या अहवालात ठेवल्याची चर्चा आहे. समजते. तर हा अहवाल सोमवार पासून सुरू होणा-या राज्य विधिमंडळाच्या अधिवेशनात मांडला जाणार असल्याने विरोधकांना आयती संधी मिळू नये म्हणून गृहनिर्माण प्रकाश मेहता मंत्रिमंडळातून हटवले जावू शकते. त्याच प्रमाणे आदिवासी विकासमंत्री विष्णू सावरा आणि आदिवासी विकास राज्यमंत्री अंबरिश आत्राम यांनाही नारळ दिला जावू शकतो.
विदर्भातील अनिल बोंडे, संजय कुटे तर अतुल सावे आणि योगेश सागर यांना राज्यमंत्रीपदाची लॅाटरी लागण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. माजी विरोधी पक्ष नेते राधाकृष्ण विखे पाटील, आशिष शेलार यांचा कॅबिनेट मंत्री म्हणून समावेश होणार आहे. शिवसेनेला एक कॅबिनेट आणि एक राज्यमंत्री पद मिळणार असले तरी शिवसेनेच्या नावांवर अजून शिक्का मोर्तब करण्यात आले नाही . आज रात्री उशीरा अथवा सकाळी शिवसेनेची नावे मुख्यमंत्री फडणवीस यांना कळविण्यात येतील.