महेता आणि भ्रष्ट मंत्र्यांवर कारवाई करण्याची धनंजय मुंडेंची मागणी

महेता आणि भ्रष्ट मंत्र्यांवर कारवाई करण्याची धनंजय मुंडेंची मागणी

मुंबई नगरी टीम

मुंबई  : राज्यपालांचे अभिभाषण पाहून राज्यात ऑल इज वेल वाटेल परंतु राज्यात काहीच ऑल इज वेल नाहीतर  नथिंग इज वेल आहे. राज्य सरकार म्हणजे आंधळा चौकीदार असल्याची जोरदार टीका विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी केली.

राज्यपालांच्या अभिभाषणावर विधान परिषदेत बोलताना धनंजय मुंडे यांनी सरकारच्या विविध योजनांची व त्या ज्यापध्दतीने राबविल्या जात आहेत त्याची अक्षरशः चिरफाड केली.राज्यपालांचे अभिभाषण म्हणजे सरकाराला वाटते हा शोले चित्रपट आहे . परंतु गेल्या साडेचार वर्षात राज्याची परिस्थिती बघता हा कारभार रामगड के शोले च्या दर्जाचा नाही उलट तो रामगोपाल वर्मा की  आग या दर्जाचा होता असा उपरोधिक टोला लगावला.समाजमाध्यमातून राज्यातले हे आंधळे सरकार ऑल इज वेल असल्याची ओरड करताना दिसत आहे. परंतु प्रत्यक्षात युवकांच्या रोजगाराची, मागासवर्गीय आरक्षण, शेतकऱ्यांच्या शेतमालाच्या भावाची, शहरी जनतेच्या कराची, एफएसआयची, जनतेच्या जीवाची, शिक्षणाच्या हक्काची, लहान मुलांच्या पोषणाची, शिक्षणसंस्थातील दुकानदारांसाठी शिक्षणाची, उद्योगासाठी सर्वसामान्य जनतेच्या जमिनीची, पीकविमा कंपन्यांच्या भल्यासाठी शेतकऱ्यांच्या खिशातून चोरी केल्याचा गंभीर आरोप  मुंडे यांनी करताना अशा महत्वाच्या मुद्यावर सरकारला धारेवर धरले.राज्यपालांच्या अभिभाषणात जुन्याच योजनांची आणि पूर्ण न झालेल्या घोषणांची लांबलचक यादी दिलेली आहे.  त्यात महाराष्ट्राच्या पुढील वाटचालीचे कोणतेही दिशादर्शन झालेले नाही असा थेट आरोपही  मुंडे यांनी केला. राज्यातला शेतकरी प्रचंड अडचणीत आहे. तो भीषण दुष्काळाशी सामना करतो आहे त्याला दिलासा दिला गेला नाही. राज्यातल्या बेरोजगारांचाही भ्रमनिरास केला आहे असेही  मुंडे म्हणाले.

राज्यात आरक्षणांबाबत सावळागोंधळ सुरु आहे.  आरक्षण देतो सांगून मराठा, धनगर, मुस्लीम  समाजाला फसविले गेले आहे.तर दुसरीकडे राज्य कर्जबाजारी झालं आहे. परंतु साडेचार वर्षात या सरकारला आश्वासने पाळता आली नाहीत आणि पुढील चार-सहा महिन्यात ती पाळणे शक्य होणार नाही हे लक्षात आल्यानंतर आता अभिभाषणात २०२२  चा वायदा केला जात आहे अशी टिकाही मुंडे यांनी केली. हजारो शेतकरी सरकारच्या शेतकरीविरोधी धोरणांमुळे आत्महत्या करीत आहेत. विशेष म्हणजे थेट मुख्यमंत्र्यांना पत्र लिहुन माझ्या मृत्युस आपण जबाबदार आहात असे लिहुन शेतकरी आत्महत्या करीत आहे. दररोज सरासरी ७ शेतकरी आत्महत्या करीत असताना त्यांना श्रध्दांजली अर्पण करण्याचा साधा मोठेपणा सरकार दाखवू शकलं नाही असा आरोपही  मुंडे यांनी केला.शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्याची घोषणा सत्तेवर येण्यापूर्वी सरकारने केली होती. उत्पन्न दुप्पट झाले नाहीच उलट शेतमालाचे भाव पाडण्याचे कटकारस्थान या सरकारने केले. उत्पन्न दुप्पट करण्यासाठी २०२२ चे आ‌श्वासन देवून शेतकऱ्यांच्या डोळ्यात पुन्हा धूळ फेकण्याचं काम सरकार करीत आहे असाही आरोप  मुंडे यांनी केला.

दूध उत्पादकांना सरकारने वाऱ्यावर सोडले आहे. दुधाला अनुदान आणि दूध भुकटीला अर्थसहाय्य अजूनपर्यंत शेतकऱ्यांना मिळालेलं नाही. सरकारची आधारभूत खरेदी योजना पूर्णपणे फसली आहे अशी टिकाही  मुंडे यांनी केली. लाखो शेतकऱ्यांचा शेतमाल सरकारने खरेदीच केलेला नाही. त्यांना हमीभाव देखील मिळाला नाही. मिळेल त्या भावात त्यांना आपला माल व्यापाऱ्यांना विकावा लागला आहे याची आठवणही सरकारला करुन दिली.जलयुक्त शिवार योजनेमध्ये प्रचंड मोठा भ्रष्टाचार झाला.चुकीच्या पध्दतीने कामे केली गेली, पोकलेन मालकांना आणि कंत्राटदारांना फायदा करुन दिला गेला. मागणी होऊनही सरकार थर्ड पार्टी ऑडिटला का घाबरते आहे ? असा सवालही  मुंडे यांनी उपस्थित केला.

पंतप्रधान आवास योजना पूर्णपणे अपयशी ठरली आहे. शिवाय मराठा आरक्षणापुढचा प्रश्न अजून संपलेला नाही. सरकार न्यायालयात ठोस बाजू मांडण्यात पूर्णपणे असफल ठरली.  धनगर आणि मुस्लीम समाजाला आरक्षण सरकारने दिलेले नाही असेही सरकारच्या निदर्शनास आणून दिले. ७२ हजार जागा भरु असे जाहीर करुन आता ८ महिन्यांचा काळ लोटला आहे. या ७२ हजार जागांपैकी एकही जागा अजून भरली गेली नाही आणि मुळात ७२ हजार जागाच रिक्त नाहीत.  त्यामुळे याबाबतही स्वत: मुख्यमंत्री राज्याची दिशाभूल करीत आहेत असा थेट आरोपही मुंडे यांनी केला. अनेक शिष्यवृत्ती योजना ऑफलाईन करण्याची नामुश्की सरकारवर आली आहे. ओबीसी विद्यार्थ्यांना शिष्यवृत्तीच मिळत नाही.  मेक इन इंडिया, मेक इन महाराष्ट्र योजना पूर्णपणे फसल्या आहेत. जे दावे केले त्यापैकी २५ टक्केही प्रत्यक्ष गुंतवणूक झालेली नाही आणि रोजगारही निर्माण झालेला नाही.  उलट वाढत्या वीजेच्या दरामुळे उद्योग महाराष्ट्राबाहेर चालले आहेत असेही  मुंडे यांनी सांगितले.

स्वर्गीय गोपीनाथराव मुंडे  स्मारकाची साडेचार वर्षात एक वीट ही रचली गेली नाही. मुंडे साहेबांच्या नावाने सुरु झालेले गोपीनाथ मुंडे कामगार महामंडळही सरकारने बरखास्त का करुन टाकलं? असा सवालही  मुंडे यांनी सरकारला केला.ऑल इज्‌ वेल आणि भाजपाचे अच्छे दिन केवळ राज्याच्या मंत्रिमंडळातील १६ भ्रष्ट मंत्र्यांना आले आहेत. विखे पाटील यांनी आता प्रकाश मेहता यांच्यावर कारवाई करून दाखवावी असे आव्हानही  मुंडे यांनी दिले.विखे पाटील यांनी केलेल्या मुंबईच्या डीपीतील १ लाख कोटी रुपये घोटाळ्यात मुख्यमंत्री कार्यालयावर आरोप केले म्हणून  त्यामुळेच यांच्यासोबत मंत्रिपदाची डील झाली आहे का ? मंत्रिमंडळातून वगळलेल्या आणि भ्रष्टाचाराचा गंभीर आरोप असलेल्या माजी मंत्र्यांवर  गुन्हे दाखल करा ?आणि मंत्रिमंडळातल्या, डझनाहून अधिक मंत्र्यांवर भ्रष्टाचाराचे गंभीर आरोप आहेत. त्यांची चौकशी कधी होणार आहे. त्या भ्रष्ट मंत्र्यांवर गुन्हे  दाखल करणार आणि त्यांना मंत्रिमंडळातून कधी हाकलणार ? असा सवाल  मुंडे यांनी मुख्यमंत्र्यांना केला.मंत्रिमंडळातून वगळलेल्या आणि नव्याने समाविष्ट करण्यात आलेल्या अनेक मंत्र्यांच्या बद्दल मुंडे यांनी चांगल्याच कोपरखळ्या लगावल्या.

Previous articleमच्छीमारांना मुंबई ट्रान्स हार्बर लिंक रोडच्या धर्तीवर  नुकसान भरपाई
Next articleविखे ‘ठगांमध्ये’ जाऊन कधी बसले कळलेच नाही : अजित पवार