विखे ‘ठगांमध्ये’ जाऊन कधी बसले कळलेच नाही : अजित पवार

विखे ‘ठगांमध्ये’ जाऊन कधी बसले कळलेच नाही : अजित पवार

मुंबई नगरी टीम

मुंबई : विरोधी पक्षनेते असताना राधाकृष्ण विखे पाटील यांनी जनतेच्या समस्यांचा डोंगर सरकारसमोर मांडल्या परंतु त्यांनाच भाजपने फोडले. विखे पाटलांनी ‘ठग्ज ऑफ महाराष्ट्र’ म्हणत हिणवले मात्र तेच विखे आज ‘ठगांमध्ये’ जाऊन कधी बसले तेच आम्हाला कळले नाही असा टोला राष्ट्रवादी काँग्रेसचे विधीमंडळ पक्षनेते अजित पवार यांनी लगावला.

राज्यपालांच्या अभिभाषणावर बोलताना अजित पवार यांनी बालभारतीच्या नवीन शिक्षण पद्धतीचे वाभाडे काढले. ही पद्धत विद्यार्थ्यांचे वाटोळे करणारे आहे असेही ते म्हणाले.विनोद तावडे यांनी शिक्षण मंत्री असताना ही नवीन पद्धत आणली त्यामुळेच त्यांना मुख्यमंत्र्यांनी बाजुला केले आणि शेलारांना शिक्षण मंत्री केले आहे का? असा सवाल करतानाच आता शेलार त्यात दुरुस्ती करतील असा टोलाही  पवार यांनी लगावला.जनता व्यक्ती म्हणून कुणाच्या हाती सरकार दिले पाहिजे याचा विचार करते. राज्यपालांच्या अभिभाषणात त्यांनी पुलवामा हल्ल्यातील शहिदांना मानवंदना वाहिली मात्र महाराष्ट्रातील शहीदांचे त्यांच्या कुटुबियांचे प्रश्न तसेच आहेत. राज्यपालांनी महात्मा गांधी यांच्या प्रती कृतज्ञता व्यक्त केली मात्र आज काही लोक नथुराम गोडसे याचे उदात्तीकरण करत आहे. हे आपल्या देशाला शोभणारे नाही. हे विचार कुठे तरी थांबवले पाहिजे असेही पवार म्हणाले.

आज राज्यात प्रचंड दुष्काळ आहे असून, चारा छावण्या सुरुच ठेवायला हव्या. हिरवा चारा उपलब्ध होत नाही तोपर्यंत छावण्या सुरू ठेवा. आज राज्यातील शेतकरी कष्टकरी सामान्य जणांच्या समोर समस्यांचा मोठा डोंगर आहे.शिवसेनेने निष्ठावान शिवसैनिकांना डावलून जयदत्त क्षिरसागर यांना मंत्रिपद दिले. हा सामान्य शिवसैनिकांवर अन्याय आहे त्यांनी किती काळ तुमच्या सतरंज्या उचलायच्या असा टोला शिवसेनेचे पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांना लगावला. ५००० कोटीचा भ्रष्टाचाराचा आरोप मुख्यमंत्र्यांवर ज्यांनी केला त्यांना मंत्रिमंडळात जागा दिली. जलयुक्त शिवार योजनेत भ्रष्टाचार झाला असे ते म्हणाले होते. त्यांनी मुख्यमंत्र्यांना स्पष्टीकरण ही देण्यासाठी सांगितले होते. त्यावर मुख्यमंत्र्यांनी भाष्य करायला हवे अशी मागणीही पवार यांनी केली.

६ मंत्र्यांना विस्तारात  वगळण्यात आले त्याचे कारण काय ? याचे कारण सभागृहाला कळायला हवे. या मंत्र्यांनी कामे केली नाही की, भ्रष्टाचार केला, की पक्षाला हवे तसे काम केले नाही त्यामुळे यांना वगळण्यात आले का ? हे स्पष्ट व्हायला हवे अशीही मागणी  पवार यांनी केली. राज्याचे कामकाज काही समाधानकारक चालत नाही, बेरोजगारी वाढली आहे. काही लाख जागा रिक्त आहेत. तरुणांची वये निघून जात आहेत. परंतु तरीही ती भरली जात नाही. राज्यात दुष्काळी परिस्थिती आहे. सरकारने अर्थ संकल्प मांडला, राज्यपालांचे अभिभाषण झाले त्यात काही मांडणी झाली तो निधीही नीट मिळत नाही.आम्ही सत्तेत असताना १० कोटी निधी विकासकामांना घेतला तर विरोधी सदस्यांना ५ कोटीचा निधी देत होतो. परंतु सध्या तशी पद्धत वापरली जात नाही. निधीत दुजाभाव सरकारकडून केला जात आहे. त्यामुळे दुजाभाव देवू नका सर्वच दिवस सारखे नसतात हे लक्षात घ्या असेही पवार म्हणाले.

मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळण्यासाठी राज्य सरकारकडून अनेक पाऊले उचलण्यात येतील असे सांगण्यात आले. तावडे यांनी यामध्ये लक्ष घालतो सांगून साडेचार वर्षे झाली परंतु राज्यपालांनी एकदाही मराठीत भाषण केलेले नाही असेही पवार यांनी सांगितले.शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी देतो सांगून अद्याप दिलेली नाही. सरसकट शेततळी देतो सांगून तीसुद्धा दिली नाही. शेतकऱ्यांची फसवणूक, थट्टा केली जात आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी द्यावी अशी मागणीही  पवार यांनी केली.

Previous articleमहेता आणि भ्रष्ट मंत्र्यांवर कारवाई करण्याची धनंजय मुंडेंची मागणी
Next articleज्यांचं करावं भलं तो म्हणतो माझंच खरं