एकूण सहा मंत्र्यांना दिला “डच्चू”
मुंबई नगरी टीम
मुंबई : फडणवीस मंत्रिमंडळातील एकूण सहा मंत्र्यांना डच्चू देण्यात आला आहे. त्यामध्ये गृहनिर्माण मंत्री प्रकाश मेहता, सामाजिक न्यायमंत्री राजकुमार बडोले, आदिवासी विकासमंत्री विष्णू सावरा यांच्यासह तीन राज्यमंत्र्यांना मंत्रिमंडळातून डच्चू देण्यात आला आहे.
ताडदेव येथील एम. पी. मिल कम्पाऊंड प्रकरणी गृहनिर्माणमंत्री प्रकाश मेहता यांचा कारभार पारदर्शी नसल्याचा ठपका लोकायुक्त एम. एल. ताहलियानी यांनी आपल्या अहवालात ठेवल्याची चर्चा असल्याने गृहनिर्माणमंत्री प्रकाश मेहता यांना मंत्रिमंडळातून अखेर डच्चू देण्यात आला आहे. मेहता यांच्यासह सामाजिक न्यायमंत्री राजकुमार बडोले, आदिवासी विकासमंत्री विष्णू सावरा, राज्यमंत्री दिलीप कांबळे, प्रवीण पोटे, अंबरिष अत्राम यांनाही डच्चू देण्यात आला आहे. त्यांच्या मंत्रीपदाचे राजीनामे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे सादर केल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी त्यांचे राजीनामे स्विकारले आहेत.उद्या सोमवार पासून सुरू होणा-या राज्य विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर विरोधकांना आयती संधी मिळू नये म्हणून अनेक मंत्र्यांना नारळ दिला आहे.