विरोधकांचा त्यांच्याच नेतृत्वावर विश्वास राहिला नाही
मुंबई नगरी टीम
मुंबई : राज्य विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन उद्यापासून सुरुवात असून, यापार्श्वभूमीवर आज झालेल्या मंत्रिमंडळात विस्तारावरून विरोधकांनी केलेल्या टीकेला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी चोख प्रत्युत्तर दिले आहे.विरोधकांचा त्यांच्याच नेतृत्वावर विश्वास राहिलेला नसल्यामुळे त्यांचे नेते पक्ष सोडत असल्याचा टोला त्यांनी लगावला आहे.
सह्याद्री अतिथीगृहावर झालेल्या पत्रकार परिषदेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अधिवेशनाच्या कामकाजाच्या रुपरेषेची माहिती दिली. उद्यापासून सुरू होणा-या अधिवेशनात नवी आणि प्रलंबित अशी एकूण २८ विधेयके मांडली जाणार असल्याचे त्यांनी सांगितले.या अधिवेशनात १३ नवी विधेयके मांडली जातील. १५ प्रलंबीत विधेयकांपैकी १२ विधानसभेत आणि ३ विधानपरिषदेत प्रलंबित आहेत. अशी एकूण २८ विधेयके या अधिवेशनात मांडली जाणार असल्याची माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली.नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीच्या निकालाच्या पार्श्वभूमीवर उत्साहात आणि आत्मविश्वासाने सत्ताधारी पक्ष या अधिवेशनाला सामोरे जात आहे. या अधिवेशनात विविध मुद्द्यांवर चर्चा होईल, विशेषतः दुष्काळावर सत्ताधारी आणि विरोधकांकडून चर्चा होईल. दुष्काळ आणि त्यासाठी राज्य सरकारने केलेल्या उपाययोजना यावर सर्वंकष चर्चा केली जाईल. ४७०० कोटी रूपये दुष्काळग्रस्तांना देण्यात आले असून, ३३०० कोटी रूपये पीकविम्यासाठी तर प्रधानमंत्री किसान निधीचा लाभ सुमारे १.२० कोटी शेतक-यांना मिळणार आहे. यासाठी शेतक-यांचे खाते अपलोड करण्याचे काम अतिशय गतीने करण्यात येत आहे. विरोधकांनी उपस्थित केलेल्या कोणत्याही विषयावर चर्चा करण्याची राज्य सरकारची पूर्ण तयारी असल्याचे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले.
या सरकारने पाच वर्षांत ठोस काम केलेले नाही. फडणवीसांचे हे आभासी सरकार आहे असा थेट आरोप विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी केला आहे. आभासी सरकार असल्याचा विरोधकांनी आरोप केला आहे मात्र, ते स्वतःच या भ्रमात आहेत. त्यांची जमिनीशी नाळ तुटलेली आहे. म्हणूनच त्यांना लाजीरवाणा पराभव पत्करावा लागला आहे असा टोला मुख्यंमंत्र्यांनी लगावला.विरोधीपक्षांनी आज घेतलेल्या पत्रकार परिषदेत एकही नवीन मुद्दा मांडलेला नाही.या अधिवेशनात मराठा आरक्षण, धनगर समाजाला दिलेली आश्वासनेही प्रतिबिंबित होतील. आघाडी सरकारच्या १५ वर्षांच्या काळात त्यांनी ज्या समाजांना फसवले त्या प्रत्येक समाजाला न्याय देण्याचे काम आम्ही करणार आहोत असे मुख्यमंत्री म्हणाले.मेहता यांच्या विषयी लोकायुक्त एम. एल. ताहलियानी यांचा अहवाल आणि कृती अहवाल मांडणार असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगून विरोधकांनी मंत्र्यांच्या विरोधात यशस्वी पुरावे मांडले नाहीत तर त्यांनी केवळ गोंधळाचे काम करून पुरावे नसताना हवेत बाण उडवल्याचा टोला त्यांनी लगावला.