आता ट्रस्टच्या जमिनी परस्पर विकता येणार नाहीत
मुंबई नगरी टीम
मुंबई : धर्मादाय आयुक्तांकडे नोंदणी केलेल्या मोठ्या ट्रस्टला त्यांच्या जमिनी विकण्यासाठी ऑनलाईन परवानगी घ्यावी लागणार आहे. यासाठीची यंत्रणा टाटा ट्रस्टच्या टि सी एस इन्फ्रास्ट्रक्चर या कंपनीमार्फत विकसित करण्यात येत असून आता ट्रस्टच्या मालकीच्या जमिनी परस्पर विकता येणार नाहीत, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज विधानपरिषदेत सांगितले.
नवी मुंबई येथील भूमीराज ग्रुपच्या संचालकांनी बनावट दाखल्यांच्या आधारे जमीन हस्तगत केल्याप्रकरणी सदस्य बाळाराम पाटील यांनी प्रश्न उपस्थित केला होता. त्याला उत्तर देताना मुख्यमंत्री म्हणाले, धर्मादाय आयुक्तांकडे नोंदणी केलेल्या ट्रस्टपैकी केवळ १० टक्के ट्रस्टकडे एक कोटी पेक्षा जास्त मालमत्ता आहे. या सर्व ट्रस्टची माहिती डिजीटल प्लॅटफॉर्मवर टाकण्यात येईल. त्यानंतर ट्रस्टच्या कोणत्याही कामासाठी लागणारी परवानगी ऑनलाईन घेता येईल. त्याचप्रमाणे ही सर्व माहिती ऑनलाईन उपलब्ध होणार असल्याने एकूण कामकाजात पारदर्शकता येणार आहे.
दरम्यान, भूमीराज ग्रुपच्या संचालकांनी स्थानिक अधिकारी यांना संगनमताने काही अनियमितता केली आहे काय, याबाबत चौकशी करून दोषींवर आरोपपत्र दाखल करण्यात येईल, असेही मुखमंत्र्यांनी यावेळी सांगितले.