नाणार मधिल तेल शुद्धीकरण प्रकल्प रायगडमध्ये स्थलांतरित होणार
मुंबई नगरी टीम
मुंबई : कोकणातील नाणार तेल शुद्धीकरण प्रकल्प रायगडमध्ये स्थलांतरित होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लेखी उत्तर देत ही माहिती दिली आहे. जमिनीचे भूसंपादन करण्याच्या अनुषंगाने रायगड जिल्हाधिकारी कार्यालयाने सिडकोकडून कागदपत्रे मागविली असून, संबंधित ४० गावातील ग्रामस्थांनी भूसंपादनास विरोध केला नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले आहे.
सौदी अरेबिया येथिल अराम्को तसेच इंडियन ऑईल, भारत पेट्रोलियम आणि हिंदुस्थान पेट्रोलियम आदींच्या सहाय्याने आकारास येणारा हा सुमारे तीन लाख कोटींचा तेलशुद्धीकरण प्रकल्प रत्नागिरी जिल्ह्य़ात राजापूर तालुक्यातील नाणारमध्ये उभारण्यात येणार होता. परंतु स्थानिक ग्रामस्थ आणि शिवसेनेने नाणार प्रकल्पाला तीव्र विरोध केला होता.लोकसभा निवडणुकीत भाजपबरोबर युती करताना नाणार येथिल हा प्रकल्प रद्द करण्याची अट घातली होती.त्यानंतर हा प्रकल्प रद्द केल्याची घोषणा मुख्यमंत्र्यांनी केली होती.विधीमंडळाचे पावसाळी अधिवेशन सध्या सुरु असून, विधानसभेत लेखी उत्तर देताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नाणार प्रकल्प रायगड जिल्ह्यात स्थलांतरित होणार असल्याची माहिती दिली आहे. तसेच प्रकल्प रायगडमध्ये आणण्यास अलिबाग, मुरूड, रोहा आणि श्रीवर्धन या चार तालुक्यातील ४० गावांनी या प्रकल्पाला विरोध केला नसल्याचेही मुख्यंत्र्यांनी लेखी उत्तरात म्हटले आहे
नाणार तेलशुद्धीकरण प्रकल्पासंदर्भात अनेक सदस्यांनी प्रश्न उपस्थित केला होता त्याला दिलेल्या लेखी उत्तरात मुख्यमंत्र्यांनी वरील माहिती दिली आहे.रायगड जिल्ह्यातील अलिबाग, मुरूड, रोहा आणि श्रीवर्धन या चार तालुक्यातील ४० गावांतील सुमारे १३ हजार ४०९.५२ हेक्टर जिनमिनीवर एकात्मिक औद्योगिक वसाहत करण्याचा सिडकोचा मानस आहे. सिडकोच्या प्रस्तावास अनसरून शासन अधिसूचना १९ जानेवारी २०१९ अन्वये सदर क्षेत्र एकात्मिक औद्योगिक वसाहत नवनगर क्षेत्र म्हणून अधिसुचित करून या विकासासाठी सिडकोची नवनगर विकास प्राधिकरण म्हणून नेमणूक करण्यात आली आहे. जमिनीचे भूसंपादन करण्याच्या अनुषंगाने भूमिअभिलेख जिल्हाधिकारी रायगड यांच्या कार्यालयाकडून कागदपत्रे सिडकोकडून मागविण्यात आली असून, या ४० गावातील ग्रामस्थांनी भूसंपादनास विरोध केला नसल्याचेही उत्तरात स्पष्ट करण्यात आले आहे.