हा तर राजकीय कट ; अभिजित बिचुकले उच्च न्यायालयात दाद मागणार

हा तर राजकीय कट ; अभिजित बिचुकले उच्च न्यायालयात दाद मागणार

मुंबई नगरी टीम

सातारा : बिग बॉसच्या घरातील सर्वात गाजलेला स्पर्धक अभिजित बिचुकले  याला सातारा पोलिसांनी धनादेश न वटल्याप्रकरणी अटक केल्यानंतर  आज न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने अभिजित बिचुकले याला धनादेश न वटल्याप्रकरणी जामीन मंजूर केला असला तरी सात वर्षापूर्वीच्या खंडणी प्रकरणी मात्र जामीन फेटाळला असल्याने बिचुकले याला दोन दिवस न्यायालयीन कोठडीत जावे लागणार आहे. ही अटक म्हणजे माझ्याविरोधात रचल्या जाणाऱ्या कट-कारस्थानाचा भाग असून, मी आगामी विधानसभा निवडणुकीला उभा राहणार असल्याने, मी निवडणूक लढवावी असे न वाटणाऱ्यांनी हे कृत्य केले असल्याचा आरोप अभिजीत बिचुकलेने केला आहे.साता-याच्या न्यायालयात सोमवारी याबाबत दाद मागणार असला तरी या प्रकरणी बिचुकले उच्च न्यायालयात जाणार असल्याचे समजते.

सातारा पोलिसांनी धनादेश न वटल्याप्रकरणी अभिजीत बिचकुलेला गोरेगाव फिल्मसिटीतील ‘बिग बॉस’च्या घरात जाऊन ताब्यात घेतले. आज साताऱ्यात वैद्यकिय तपासणी केल्यानंतर अभिजित बिचुकलेने छातीत दुखत असल्याचे सांगितल्याने त्याला उपाचारांसाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. यावेळी एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत त्याने मौन सोडले. बिचुकले म्हणाला की, ‘माझ्या विरोधात तक्रार करणारे संदीप संपकाळ यांच्या घरी माझे कुटुंब गेल्या १२ वर्षापासून भाड्याने राहात आहे. आम्ही संपकाळ यांना नियमीतपणे भाडे  देतो. आमच्या कौटुंबाचे संपकाळ यांच्याशी चांगले संबंध होते. मात्र त्यांनी अचानक इतके जुने प्रकरण का उकरून काढले हे  समजत नाही. माझ्याविरोधात पोलिसांमध्ये तक्रार करणे हा राजकीय कट असून, संपकाळ यांना माझ्याविरोधात भडकवण्यात आले आहे. हे सर्व केवळ राजकीय स्वार्थासाठी  केले जात आहे. मी आगामी विधानसभा निवडणुक लढविणार असल्याने, मी ही निवडणूक लढवावी असे न वाटणाऱ्यांनी हे कृत्य केले आहे असा आरोप बिचुकले याने केला आहे.

बिचुकले याला आज शनिवारी सातारा न्यायालयात हजर करण्यात आल्यानंतर अभिजित बिचुकलेला धनादेश न वटल्याप्रकरणी न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे तर सात वर्षापूर्वीच्या एका खंडणी प्रकरणी मात्र जामीन फेटाळला आहे. त्यामुळे बिचुकलेला दोन दिवस न्यायालयीन कोठडीत जावे लागणार आहे. या प्रकरणी बिचुकले पुन्हा सोमवारी न्यायालयात दाद मागणार आहे. त्याच बरोबर याबाबत उच्च न्यायालयात जाणार असल्याचे समजते.  या प्रकारामुळे बिचुकले याचा बिग बॉसमधील प्रवास येथेच थांबणार का, याची उत्सुकता सातारकरांसह राज्यातील त्यांच्या चाहत्यांना लागली आहे.बिग बॉसच्या घरातील एक कार्यात  बिचुकले आणि सहस्पर्धक रूपाली भोसले यांच्यात प्रचंड वादावादी झाली. बिचुकले खोटे बोलतात, इतरांना फसवतात, असा आरोप रूपालीने केला होता. बिचुकलेंनी हे आरोप फेटाळताच, मुलीची शपथ घ्या, असे रूपाली म्हणाली. ते ऐकल्यानंतर बिचुकलेंचा संताप अनावर झाला आणि त्यांनी रूपालीला अर्वाच्य भाषेत शिवीगाळ केली.आज बिचुकले याला एका प्रकणात जामीन नाकारण्यात आल्यानंतर त्याच्या चाहत्यांमध्ये तीव्र प्रतिक्रिया उमटल्या असून, त्याला राजकारण विरहित पाठिंबा मिळत आहे.

काय आहे प्रकरण

अ‍ॅड. संदीप सपकाळ यांनी २०१५ मध्ये अभिजित बिचुकले याला साता-यातील केसरकर पेठेतील फ्लॅट भाड्याने दिला होता. त्यावेळी बिचुकले याने सपकाळ यांच्याकडून २८ हजार रुपये उसवारीने घेतले होते. याबदल्यात बिचुकले याने सपकाळ यांना धनादेश दिला होता. हा धनादेश बँकेत जमा केला असता तो वटला नाही. त्यामुळे त्यांनी न्यायालयात खटला दाखल केला. या खटल्यासाठी न्यायालयात हजर राहण्यासाठी न्यायालयाने अनेकदा बिचुकलेला समन्स बजावले होते. मात्र, बिचुकले कोर्टात हजर राहिला नाही. त्यानंतर न्यायालयाने  बिचुकले विरोधात अटक वॉरंट काढले.

कोण आहे अभिजित बिचुकले  

अभिजित बिचुकले  याने सातारा येथील लालबहादूर शास्त्री कॉलेजमधून बीए (इंग्रजी) पूर्ण केले असून,  कविता करण्याच्या छंदामुळे त्याला कवी मनाचे नेते या टोपण नावाने साता-यात ओळखले जाते. क्षितीज हा त्याचा बाल कविता संग्रह १९९६ मध्ये प्रकाशित झाला आहे. अभिजित बिचुकले हा पंधरा वर्षांपूर्वी सातारा पालिकेचा कर्मचारी होता. कामात कुचराई, कामावर हजर न राहणे त्यामुळे  त्याची विभागीय चौकशी करण्यात आली. चौकशीत तो दोषी आढळल्याने त्याला पालिकेने सेवेतून बडतर्फ केले गेले. त्यानंतर त्याने आपला मोर्चा राजकीय क्षेत्राकडे वळविला. दोन वेळा लोकसभा तर सांगली जिल्ह्यातील कडेगाव-पलूस विधानसभा मतदार संघातूनही त्याने पोट निवडणूक लढविण्यासाठी अर्ज दाखल केला होता.  एक दिवस मी पंतप्रधान होणार, असेही तो म्हणाला होता.

Previous articleजनावरांना चारा की भाजप-शिवसेना कार्यकर्त्यांना कुरण
Next articleविधानसभेच्या उमेदवारीसाठी काँग्रेसकडे अर्ज करण्याची मुदत ६ जुलैपर्यंत