मराठा समाजाच्या एकजुटीचा विजय
मुंबई नगरी टीम
मुंबई : मराठा आरक्षण कायदा उच्च न्यायालयाने वैध ठरवला आहे. उच्च न्यायालयाच्या या निर्णयामुळे महाराष्ट्रातील मराठा समाजाला सरकारी नोकऱ्या व शैक्षणिक प्रवेशात आरक्षणाचा लाभ मिळणार आहे. हा मराठा समाजाच्या एकजुटीचा विजय असल्याची प्रतिक्रिया देत विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी समाधान व्यक्त केले आहे. त्यांनी ट्विटरद्वारे ही प्रतिक्रिया दिली आहे.
धनंजय मुंडे आपल्या ट्विटमध्ये म्हणाले की, ही अत्यंत आनंदाची बातमी आहे. मराठा आरक्षणाला उच्च न्यायालयाने वैध ठरवले आहे. आरक्षणासाठी विरोधी पक्षाने सातत्याने या मागणीबाबत सभागृहात आणि पाठपुरावा केला, आंदोलनात सहभाग घेतला. शेवटी निकाल मराठा समाजाच्या बाजूने लागला याचे समाधान वाटते. गेल्या पाच वर्षांपासून विविध मार्गाद्वारे धनंजय मुंडे आणि इतर विरोधीपक्षातील नेते सभागृहात व सभागृहाबाहेर मराठा आरक्षणाचा मुद्दा मांडत होते. मराठा समाजाच्या बाजुने निकाल लागल्याने मुंडे यांनी उच्च न्यायालयाच्या या निर्णयाचे स्वागत केले आहे.