झोपेचे सोंग घेतलेल्या सरकारला जागे करण्यासाठी आंदोलन
मुंबई नगरी टीम
नांदेड : शेतकऱ्यांच्या मालाला हमी भाव नाही. शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळाली नाही. पीक विमा मिळाला नाही, पीक कर्ज नाही. बी-बियाणे व खताचे भाव आकाशाला भिडले आहेत. शेतकरी संकटात असताना सरकार मात्र झोपेचे सोंग घेऊन बसले आहे. या सरकारला जागे करण्यासाठी काँग्रेस पक्षाच्या वतीने आज नांदेड शहरासह जिल्ह्यातील १६ तहसील कार्यालयांसमोर शेतकर्यांच्या विविध प्रश्नांसाठी धरणे आंदोलन करण्यात आले.
अशोक चव्हाण जिल्हाधिकारी कार्यालयासमोरील धरणे आंदोलनात सहभागी झाले व कार्यकर्त्यांना संबोधीत केले. त्यानंतर भोकर येथील आंदोलनाचे नेतृत्व करण्यासाठी ते रवाना झाले. नांदेड येथे बोलतांना अशोक चव्हाण यांनी राज्य सरकारच्या कारभारावर चौफेर टीका केली. ते म्हणाले की, जिल्ह्याचा टंचाई आराखडा डिसेंबर महिन्यात तयार करण्यात आला. परंतु या आराखड्याच्या अंमलबजावणीची बैठक मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात घेण्यात आली. त्यामुळे तीव्र दुष्काळात सुध्दा शासनाकडून काहीच उपाययोजना करण्यात आल्या नाहीत. नागरिकांना पिण्याच्या पाण्याच्या तीव्र टंचाईला सामोरे जावे लागले.जिल्ह्यामध्ये अवैध धंद्याला ऊत आला आहे. सत्ताधारी पक्षाचे पुढारी व अधिकार्यांची मिलीभगत आहे. जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात रेतीचा उपसा होतो. गोरगरीबांसाठीचे स्वस्त धान्य परराज्यात अवैधरित्या पाठविले जात आहे. यावर सरकारी अधिकारी गप्प आहेत. जिल्ह्यात भ्रष्टाचार बोकाळला असून त्यासाठी शासन आणि प्रशासनाची मिलिभगत असल्याचा आरोप काँग्रेस प्रदेशाध्यक्षांनी केला.
शेतक-यांना कर्ज मिळत नाही. कर्जमाफीची केवळ नौटंकी सुरु आहे. पिकविमा कंपन्यांना फायदा होईल असेच सरकारचे धोरण आहे. शेतकर्यांच्या प्रश्नांकडे या सरकारने साफ दुर्लक्ष केले आहे. हे फडणवीसांचे नसून फसणवीसांचे सरकार आहे. केवळ घोषणा मागून घोषणा केल्या जातात. पण त्याची अंमलबजावणी होत नाही, ही बाब दुर्देवी असल्याचे अशोक चव्हाण यांनी यावेळी सांगितले.