काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षपदी बाळासाहेब थोरात
मुंबई नगरी टीम
मुंबई : महाराष्ट्र काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षपदी बाळासाहेब थोरात यांची नियुक्ती करतानाच प्रदेश काँग्रेसला उभारी देण्यासाठी पाच कार्याध्यक्षांची नियुक्ती करण्यात आली आहे.
नितीन राऊत, बसवराज पाटील, विश्वजीत कदम, यशोमती ठाकूर आणि मुझफ्फर हुसेन या पाच जणांची कार्याध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे.
लोकसभा निवडणुकीमध्ये काँग्रेसला सपाटून मार खावा लागला होता. माजी प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण पराभूत झाल्याने आगामी विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर राज्यात नेतृत्व बदलाची चर्चा सुरू झाली होती. अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस के.सी.वेणूगोपाल यांनी बाळासाहेब थोरात यांची प्रदेशाध्यक्षपदी नियुक्ती केल्याची घोषणा केली. थोरात यांच्यासह पाच कार्याध्यक्षाची नियुक्ती करण्यात आली आहे.नितीन राऊत, बसवराज पाटील, विश्वजीत कदम, यशोमती ठाकूर आणि मुझफ्फर हुसेन या पाच जणांचा या मध्ये समावेश आहे.राज्यातील आगामी विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर काँग्रेसने विविध समित्यांची नियुक्ती केली आहे. मात्र मावळते प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांना कुठल्याही समितीमध्ये स्थान देण्यात आले नाही.
विविध समित्यांच्या प्रमुखांची नावे पुढीलप्रमाणे
रणनीती समिती – बाळासाहेब थोरात
जाहीरनामा समिती – पृथ्वीराज चव्हाण
निवडणूक समिती – बाळासाहेब थोरात
समन्वय समिती – सुशीलकुमार शिंदे
प्रचार समिती – नाना पटोले
प्रसिद्धी समिती – रत्नाकर महाजन
माध्यम आणि संपर्क समिती – राजेंद्र दर्डा
निवडणूक व्यवस्थापन समिती – शरद रणपिसे