डोंगरीतील दुर्घटनेची सर्वंकष चौकशी

डोंगरीतील दुर्घटनेची सर्वंकष चौकशी

मुंबई नगरी टीम

मुंबई : डोंगरी परिसरात इमारत कोसळून झालेल्या दुर्घटनेची सर्वंकष चौकशी केली जाईल. यादरम्यान दुर्घटना स्थळी बचाव व मदत कार्यासाठी सर्वोच्च प्राधान्य दिले जात आहे. त्यासाठी सर्व यंत्रणांना सतर्क आणि सक्रिय केल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी येथे सांगितले.

मंत्रालयात मंत्रिमंडळाच्या बैठकीतच या दुर्घटनेची मुख्यमंत्री फडणवीस यांनी माहिती घेतली. त्यानंतर ते माध्यम प्रतिनिधींशी बोलत होते.मुख्यमंत्री म्हणाले, ही इमारत शंभर वर्षे जुनी आहे. त्यामुळे ती धोकादायक म्हणून घोषित केली होती. तिच्या पुनर्विकासाचे काम विकासकाकडे सोपविण्यात आले होते. पण त्यामध्ये दिरंगाई का झाली याची चौकशी केली जाईल. या ठिकाणी १५ कुटुंबं राहतात. त्यामुळे दुर्घटनेत अडकलेल्यांपर्यंत पोहचणे बचाव व मदत कार्यास गती देण्यावर भर दिला जात आहे. यासाठी एनडीआरएफ आणि महापालिकेच्या यंत्रणा घटनास्थळी पोहोचल्या आहेत. गृहनिर्माण मंत्री राधाकृष्ण विखे- पाटील घटनास्थळी पोहोचले आहेत. वैद्यकीय शिक्षण मंत्री गिरीश महाजन आवश्यक त्या वैद्यकीय सुविधा पोहचविण्यासाठी लक्ष ठेवून आहेत. दुर्घटनेचा परीसर अरूंद आणि दाटीवाटीचा असल्याने या परिसरातील कोंडी टाळून बचाव पथकांना सहकार्य करण्याचे आवाहनही मुख्यमंत्री  फडणवीस यांनी केले.बचाव व मदत कार्यानंतर दुर्घटनेची चौकशी व अन्य आवश्यक बाबींवर निर्णय घेण्यात येईल असेही त्यांनी सांगितले.

Previous articleकाँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षपदी बाळासाहेब थोरात
Next articleमुंबई शहराबाबत भाजप शिवसेनेची निष्क्रियता चव्हाट्यावर