२५ आमदार निवडून आणण्याचा धनगर समाजाचा निर्धार

२५ आमदार निवडून आणण्याचा धनगर समाजाचा निर्धार

मुंबई नगरी टीम

मुंबई : धनगर समाजासाठी करण्यात आलेल्या टाटा सामाजिक विकास संस्थेचा (टिस) अहवाल सकारात्मक असून धनगर समाजाला येत्या विधानसभा  निवडणुकीपूर्वी आरक्षण मिळण्याची शक्यता आहे असे सांगत धनगर समाज येत्या विधानसभा निवडणुकीत संपूर्ण ताकदनिशी उतरणार असून, किमान २५ आमदार निवडून आणणार असल्याचा निर्धार बारा बलुतेदार परिवर्तन आघाङीचे कार्याध्यक्ष हेमंत पाटील यांनी व्यक्त केला आहे.

आज मुंबई येथे माजी न्यायमूर्ती बी.जे. कोळसे पाटील यांच्या अध्यक्षतेखाली  बारा बलुतेदार परिवर्तन आघाडीची स्थापना करण्यात आली त्यावेळी पाटील यांनी ही माहिती दिली. तानसेन भाई ननावरे , गजानन शिरसाट , विजय घाटे, समाधान नावकर, संजय कोकरे, संजय कांबळे, तसेच इतर अनेक पक्षाचे मान्यवर उपस्थित होते.

धनगर समाजाला आरक्षण मिळावे यासाठी धनगर समाज मोठ्या प्रमाणात रस्त्यावर उतरला होता. विविध आंदोलन करून धनगर समाजाने सरकारला आपली ताकद दाखवून दिली. यामुळे शासनाने धनगर समाजाचे सर्व्हेक्षण करण्याचे काम टीस संस्थेला दिले होते. या संस्थेने धनगर अभ्यास करून तसा अहवाल शासनाला सादर केला आहे. हा अहवाल आरक्षणासाठी सकारात्मक असल्याचे समजते असे पाटील यांनी सांगितले. मात्र तरीही शासनाकडून तत्काळ आरक्षण लागू केले जात नाही. हे आरक्षण लागू होणार अशी आशा असली तरी विधानसभेत धनगर समाजाचे लोकप्रतिनिधी मोठ्या प्रमाणात असणे गरजेचे आहे. या पार्श्वभूमीवर येत्या निवडणुकीत धनगर समाज संपुर्ण ताकदीने उतरणार असून महाराष्ट्रात धनगर समाजाचे २५ उमेदवार निवडून आणण्यासाठी आम्ही प्रयत्न करणार आहोत असेही पाटील यांनी सांगितले. तसेच बारा बलुतेदार परिवर्तन आघाडीच्या माध्यमातून काँग्रेस सोबत युती करण्यास इच्छुक आहोत, आमची युती ११० ते १२० छोट्या मोठया पक्षा बरोबर करण्यासाठी प्रयत्न चालू असून याबाबत लवकरच कोअर कमिटीत निर्णय घेतला जाणार आहे, डॉ. प्रकाश आंबेडकर यांनी चर्चा केल्यास वंचित आघाडीसोबत युती होऊ शकते असेही पाटील यांनी सांगितले. धनगर समाजाच्या उमेदवारांना निवडून आणण्यासाठी महाराष्ट्रातील सर्व समाजातील घटकांना एकत्र करून तळागाळातील मतदार जागरूक करणार असल्याचे हेमंत पाटील यांनी सांगितले.

Previous articleसमृद्धीच्या कर्जासाठी राज्य सरकारची हमी म्हणजे आर्थिक बेशिस्तच
Next articleमेडीकल प्रवेशासाठी एसबीसींना २ टक्के स्वतंत्र आरक्षण कधी ?