भाजपाचे कार्याध्यक्ष जे.पी. नड्डा यांचे मुंबईत जोरदार स्वागत

भाजपाचे कार्याध्यक्ष जे.पी. नड्डा यांचे मुंबईत जोरदार स्वागत

मुंबई नगरी टीम

मुंबई : भारतीय जनता पार्टीच्या कार्यकारी राष्ट्रीय अध्यक्षपदी नियुक्ती झाल्यानंतर प्रथमच महाराष्ट्राच्या दौ-यावर आलेले जे. पी. नड्डा यांचे भाजपाच्यावतीने जोरदार स्वागत करण्यात आले. या निमित्ताने भाजपाने जोरदार शक्तीप्रदर्शन केले.

भारतीय जनता पार्टीचे कार्यकारी राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांनी पदभार स्वीकारल्यानंतर प्रथमच महाराष्ट्राच्या दोन दिवसाच्या दौ-यासाठी आज मुंबईत आगमन झाले. यानिमित्ताने भाजपाने जोरदार शक्तीप्रदर्शन केले.कार्याध्यक्ष नड्डा यांचे मुंबई विमानतळावर आगमन होताच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांचे पुष्पगुच्छ देवून स्वागत केले. यावेळी राज्यमंत्रिमंडळातील मंत्री, भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, मुंबई भाजपाचे अध्यक्ष आ. मंगलप्रभात लोढा, केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे आदी उपस्थित होते. त्यानंतर कार्याध्यक्ष जे.पी.नड्डा यांनी विमानतळाजवळील छ. शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पदार अर्पण करून अभिवादन केले. त्यानंतर दादर येथिल वसंतस्मृती येथे पदाधिकारी  जिल्हाध्यक्ष, खासदार  आमदार तसेच अन्य बैठकांना ते मार्गदर्शन करणार आहेत.उद्या रविवारी  दादर येथे चैत्यभूमीला अभिवादन करतील आणि स्वातंत्र्यवीर सावरकर स्मारक तसेच शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे स्मारक येथे भेट देऊन वंदन करतील. त्यानंतर ते गुंडवली, अंधेरी येथे भाजपाच्या बूथ समितीच्या कार्यक्रमात सहभागी होणार असून, तेथे त्यांच्या हस्ते भाजपाची सदस्यता नोंदणी करण्यात येईल.

 भारतीय जनता पार्टीच्या प्रदेश कार्यसमितीची बैठक उद्या रविवारी गोरेगाव येथील नेस्को संकुल येथे होणार असून, या बैठकीचे उद्घाटन कार्यकारी राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डा यांच्या हस्ते व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष महसूल मंत्री चंद्रकांत पाटील, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी तसेच रावसाहेब पाटील दानवे यांच्या उपस्थितीत होईल. या बैठकीचा समारोप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या भाषणाने होईल.या बैठकीत नड्डा यांच्या मार्गदर्शनाबरोबरच नवनिर्वाचित प्रदेशाध्यक्ष महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांचे अध्यक्षीय भाषण होईल. त्याशिवाय केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि प्रदेश प्रभारी सरोज पांडे हे मार्गदर्शन करणार आहेत. राज्याचे वित्तमंत्री सुधीरभाऊ मुनगंटीवार आणि महिला व बालकल्याणमंत्री पंकजा मुंडे राजकीय प्रस्ताव मांडणार आहेत. तर प्रदेश सरचिटणीस आ. सुजीतसिंह ठाकूर हे महाजनादेश यात्रेविषयी माहिती देणार आहेत

Previous articleलक्ष्मीनगरचा एकात्मिक विकास आराखडा करणार
Next articleसुरक्षित व पारदर्शक  ऑनलाईन प्रणालीमुळे म्हाडात दलालांना थारा नाही