आता मुंबई ते पुणे प्रवास होणार केवळ २३ मिनिटांत
मुंबई नगरी टीम
मुंबई : मुंबई-पुणे हायपरलूप प्रकल्पास पायाभूत सुविधा प्रकल्प म्हणून घोषित करण्यास तसेच डीपी वर्ल्ड एफझेडई व हायपरलूप टेक्नोलॉजीज्, आयएनसी यांच्या भागीदारी समुहास मूळ प्रकल्प सूचक म्हणून घोषित करण्यास आज झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत मंजुरी देण्यात आली.
मुंबई-पुणे हायपरलूप प्रकल्प हा मुंबई व पुणे या दोन महानगरांना हायपरलूप तंत्रज्ञानाद्वारे जोडणारा प्रस्तावित अत्याधुनिक वाहतूक प्रकल्प आहे. हा प्रकल्प मुंबई-पुणे (कुर्ला बीकेसी ते वाकड) दरम्यान ११७.५० कि.मी. अंतरासाठी राबविला जाणार आहे. सुमारे ७० हजार कोटी रुपयांची थेट परकीय गुंतवणूक यामध्ये होणार असून एवढ्या मोठ्या प्रमाणात अशी गुंतवणूक होणारा हा देशातील पहिलाच प्रकल्प आहे. विशेष म्हणजे, अतिवेगवान प्रवास साध्य करणारा हा जगातील पहिलाच हायपरलूप प्रकल्प ठरणार आहे. या प्रकल्पामध्ये प्रस्तावित गती ४९६ किमी प्रतितास अपेक्षित असून त्यामुळे पुणे ते मुंबई यामधील प्रवासाचा कालावधी फक्त २३ मिनिटांचा होणार आहे. प्रारंभी, पहिल्या टप्प्यात जवळपास पाच हजार कोटी खर्च होणार असून या टप्प्यात ११.८० कि.मी. लांबीचा पथदर्शी प्रकल्प म्हणून पुणे महानगर प्रदेशामध्ये बांधकाम करण्यात येणार आहे. पथदर्शी प्रकल्प हा दोन ते अडीच वर्षात राबविण्यात येणार आहे. त्यानंतर उर्वरित प्रकल्प पूर्ण करण्यात येईल. संपूर्ण प्रकल्प ६ ते ७ वर्षांत पूर्ण करण्यात येईल.पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणामार्फत राबविण्यात येणाऱ्या पुणे मुंबई हायपरलूप प्रकल्पास पायाभूत सुविधा प्रकल्प म्हणून घोषित करण्यास व डीपी वर्ल्ड एफझेडई व हायपरलूप टेक्नॉलॉजीज्, आयएनसी यांच्या भागीदारी समुहास मूळ प्रकल्प सूचक म्हणून घोषित करण्यास मान्यता देण्यात आली आहे. या वैशिष्ट्यपूर्ण प्रकल्पासाठी नीती आयोगाने पुढाकार घेतला आहे. हा प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर देशाच्या परिवहन क्षेत्रात एक क्रांतिकारक पर्व सुरु होणार आहे.