नाना पटोलेंनी मुख्यमंत्र्यांचे आव्हान स्विकारले

नाना पटोलेंनी मुख्यमंत्र्यांचे आव्हान स्विकारले

मुंबई नगरी टीम

मुंबई : गेल्या पाच वर्षात फडणवीस सरकारने दुप्पट काम केले असून त्यावर कुठल्याही व्यासपीठावर वाद-विवाद करायला तयार असल्याचा आव्हान राज्याचे मुख्यमंत्री मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जनादेश यात्रेदरम्यान जाहीर सभांमधून विरोधकांना केले आहे. मुख्यमंत्र्यांचे हे आव्हान माजी खासदार यांनी स्विकारले असून,आता मुख्यमंत्र्यांनी दुप्पट कामाचे क्षेत्र,खाते,विभाग सांगुन चर्चेसाठी वेळ व स्थळ निश्चित करावे असे त्यांनी म्हटले  आहे.

आज एका पत्रकार परिषदेत बोलतांना ते पुढे म्हणाले की, आता हे आव्हान मुख्यमंत्र्यांनी न स्विकारल्यास राज्यात ज्या ज्या ठिकाणी देवेंद्र फडणवीसांनी महाजनादेश यात्रा आयोजित केल्या आहे तेथेच काँग्रेसच्या वतीने’फडणवीस दामदुप्पट पर्दाफाश महामेळावे’ आयोजित करून मुख्यमंत्र्यांचा खोटारडेपणा पुराव्यानीशी जनतेसमोर मांडणार असल्याचे पटोले यावेळी म्हणाले.राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या वास्तव्याने आणि कर्माने पुण्यभुमी बनलेल्या गुरूकुंज मोझरी येथुन भाजप सेनेचे’फसवणीस’ नावाने ओळखले जाणारे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महाजनादेश यात्रांची सुरूवात केली. या जाहीर सभांना संबोधीत करतांना ते ‘फडणवीस सरकारने’ दुप्पट काम केल्याचे सांगत आहेत. मात्र त्यांचे हे वक्तव्य म्हणजे गावोगावी फिरून भोळ्याभाबड्या जनतेला ‘दुप्पट सोने’ करून देतो असे सांगुन फसवणुक करणाऱ्यांची हि सुधारीत आवृत्ती आहे असा आरोप  पटोले यांनी केला.

सर्वसामान्य जनतेला वास्तव माहिती नसल्याने जनता भुलथापांना बळी पडू शकते. त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी न केलेल्या विकासकामांचा फुगा कितीही फुगवला तरी सत्याची एक टाचणीच त्यातील हवा काढण्यास पुरेशी आहे.मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पाच वर्षातील दुप्पट कामे केलेले क्षेत्र, वाद विवादाच्या विषयांचा अजेंडा आणि तारीख, वेळ व ठिकाण त्यांच्या सोयीनुसार महाजनादेश यात्रेच्या दुसऱ्या टप्प्यापुर्वी ठरवून जाहिर करावी. या ठिकाणी चर्चेला येऊन आकडेवारीनिशी पर्दाफाश करायला आम्ही तयार आहोत असे पटोले म्हणाले. मुख्यमंत्र्यांनी सरकारी अधिकारी आणि आकृतीबंधाच्या बाहेर जाऊन मुख्यमंत्री कार्यालयात ट्रेनी म्हणुन भरती केलेल्या संघी कार्यकर्त्यांकडून टिप्स घेऊन सर्व तयारीनिशी वाद विवादाला यावे अन्यथा महाजनादेश यात्रेचा सरकारी खर्चाने  व शासकीय यंत्रणेचा गैरवापर करून चालु असलेला फार्स तातडीने बंद करावा, गुरूकुंज मोझरी या पवित्र स्थळी दिलेला’जनादेश न मागण्याच्या’ वक्तव्यावर ठाम राहात घरचा रस्ता धरावा असे थेट आव्हान  पटोले यांनी दिले.मुख्यमंत्र्यांनी ‘सवयीप्रमाणे’ आपला शब्द न पाळल्यास महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी, मित्रपक्ष आणि विवीध संघटनांच्या माध्यमातून पर्दाफाश महामेळावे आयोजीत करण्यात येतील अशी माहिती त्यांनी दिली.

२०१४ पासून जर फडणवीस सरकारने खरोखरच सिंचन, शेती, शहर विकास, दुष्काळ, बेरोजगारी निर्मुलन,आदिवासी, मागासवर्गीय, अल्पसंख्यांक, विविध जातीसमुह यांच्या विकासासाठी व समस्या सोडविण्यासाठी काही टक्के जरी काम केले असते तर भाजप सेना  सरकारला राज्यात पंचतारांकीत सुविधा उपभोगत महाजनादेश यात्रेची नौटंकी करण्याची गरज भासली नसती. जनता आपल्या कारभारावर प्रचंड नाराज आहे हे या सरकारला पोलीस यंत्रणेकडून समजले आहे. त्यामुळेच हा अवाढव्य खर्च करून जनतेला भुलथापा देण्याचा कार्यक्रम सुरू आहे.मुख्यमंत्री फडणवीस यांनी तातडीने हे आव्हान स्विकारून चर्चेला यावे अन्यथा पर्दाफाश होण्यासाठी तयार राहावे असे आव्हान यावेळी पटोले यांनी केले.

Previous articleशिवस्वराज्य यात्रेत घुमणार नव्या “स्वराज्याचा नवा लढा”  
Next articleएसटीचे स्टेअरिंग आता महिलांच्या हाती